मुख्य निर्मिती उद्योगाचे उत्पादन ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

देशाचे इतर उद्योग चालवण्‍यासाठी कच्चा माल किंवा आवश्‍यक संसाधने पुरवणारी क्षेत्रे ही प्रमुख क्षेत्रे आहेत.
मुख्य निर्मिती उद्योगाचे उत्पादन ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात देशातील आठ प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या उत्पादनातील वाढ ७.८ टक्के झाली आहे. केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्रालयाने २९ डिसेंबर रोजी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये मुख्य क्षेत्राचा विकास दर सहा महिन्यांतील सर्वात कमी राहिला आहे. तसेच ऑक्टोबरच्या तुलनेत त्यात मोठी घसरण झाली आहे.

उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये कोळसा, कच्चे तेल, पोलाद, सिमेंट, वीज, खते, रिफायनरी उत्पादने आणि नैसर्गिक वायू या आठ प्रमुख क्षेत्रांतील वाढीचा दर १२.१ टक्के होता. मात्र, गेल्या महिन्यात औद्योगिक उत्पादनाची गती खूपच कमी राहिली. नोव्हेंबरमध्ये प्रमुख क्षेत्रांतील वाढीचा दर ७.८ टक्क्यांवर घसरला.

नोव्हेंबरमध्ये आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ सहा महिन्यांतील निचांकी पातळीवर राहिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये हा आकडा ५.७ टक्के होता. वार्षिक आधारावर आठ महिन्यांच्या आकडेवारीबद्दल बोललो, तर चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या आठ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-नोव्हेंबरमध्ये मुख्य उद्योगांचे उत्पादन ८.६ टक्के दराने वाढले आहे. तर गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या आठ महिन्यांत एप्रिल-नोव्हेंबर २०२२ मध्ये हा वेग ८.१ टक्के होता. देशातील आठ प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, पोलाद, सिमेंट, कच्चे तेल, खते आणि वीज क्षेत्रांचा समावेश आहे. देशाचे इतर उद्योग चालवण्‍यासाठी कच्चा माल किंवा आवश्‍यक संसाधने पुरवणारी क्षेत्रे ही प्रमुख क्षेत्रे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in