चंद्रावर आढळला ऑक्सिजन- चांद्रयानच्या प्रज्ञान रोव्हरकडून शोध, इस्रोची माहिती

चंद्राच्या मातीत कोणती मूलद्रव्ये आहेत त्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत
चंद्रावर आढळला ऑक्सिजन- चांद्रयानच्या प्रज्ञान रोव्हरकडून शोध, इस्रोची माहिती
Published on

बंगळुरू : चांद्रयान-३ च्या प्रज्ञान रोव्हरवरील उपकरणांना चंद्रावर अन्य मूलद्रव्यांसह ऑक्सिजनचेही अस्तित्व आढळून आले असल्याची माहिती मंगळवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केली.

प्रज्ञान रोव्हरवर लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (लिब्ज) नावाचे उपकरण आहे. हे उपकरण इस्रोच्या बंगळुरूस्थित लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टिम्स (लिऑस) या प्रयोगशाळेने तयार केले आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावर लेझरचे उच्च ऊर्जेचे लहान झोत सोडते. लेझरच्या या पल्समुळे त्या ठिकाणी अत्यंत उष्ण प्लाझ्मा तयार होतो. प्लाझ्मापासून निघालेला प्रकाश लिब्ज उपकरण गोळा करते आणि चार्ज्ड कपल्ड डिव्हायसेस त्याच्या माहितीचे पृथक्करण करतात. प्रत्येक मूलद्रव्याच्या प्लाझ्मापासून निघणाऱ्या प्रकाशकिरणांची तरंगलांबी (वेव्हलेंथ) वेगवेगळी असते. त्याचा अभ्यास करून चंद्राच्या मातीत कोणती मूलद्रव्ये आहेत त्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

त्यानुसार प्रज्ञानला चंद्रावर अॅल्युमिनियम, गंधक, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि टायटॅनियम या मूलद्रव्यांचे अस्तित्व आढळून आले. अधिक अभ्यासानंतर चंद्रावर मँगेनिज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्येही आढळली. आता चंद्रावर हायड्रोजनचा शोध सुरू आहे. भारताच्या यापूर्वीच्या चांद्रमोहिमेत चंद्रावर पाण्याचे अंश सापडले होते. पाणी, ऑक्सिजन आणि हायड्रोजन पुरेशा प्रमाणात असतील तर तेथे जीवनाला पोषक वातावरण असण्याची शक्यता असू शकते.

logo
marathi.freepressjournal.in