
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2023) पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्म पुरस्कार (Padma Awards 2023) विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. यावेळी तबलावादक झाकीर हुसेन, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, कर्नाटकचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, यावेळी तब्बल १०६ पद्म पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण व ९१ पद्मश्री पुरस्कारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण १२ दिग्गजांचा समावेश आहे. उद्योगपती बिर्ला, दीपक धर, गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ समाजसेवक भिकुजी इदाते, रंगकर्मी परशुराम खुणे, सामाजिक कार्यकर्ते गजानन माने, लेखक रमेश पतंगे, अभिनेत्री रविना टंडन, कुमी वाडिया यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच, राकेश झुनझुनवाला यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.