
नवी दिल्ली : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करण्यासाठी पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
भारताने कडक पावले उचलत बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने हल्लेखोरांना पाकिस्तानच्या असलेल्या थेट पाठिंब्यावरून प्रहार केला. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर थेट आरोप केला असून पाकिस्तानी दूतावास बंद करण्यास सांगितले आहे आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.
पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद करण्यात आला असून एका आठवड्यामध्ये भारतातील पाकिस्तानच्या राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा, असा आदेशही देण्यात आला आहे. भारतातील पाकिस्तानी उच्च आयोग बंद करण्यात आला असून अधिकाऱ्यांना पाकिस्तानात माघारी जाण्याचे आदेश दिले आहेत.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, सीसीएस निर्णयात सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अटारी बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्कअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणारी व्हिसा सूट रद्द करण्यात आली आहे आणि त्याअंतर्गत, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारतातील सर्व पाकिस्तानी लष्करी सल्लागारांनाही एका आठवड्याच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारताने इस्लामाबादमधून सल्लागारांनाही परत बोलावले आहे. उच्चायुक्तालयांची एकूण संख्या ३० पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताचे पाच मोठे निर्णय
१९६० साली लागू झालेला सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे. पाकिस्तानवर याचा मोठा परिणाम होणार आहे, अटारी सीमा बंद करण्यात आलेली आहे. भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये असतील तर त्यांनी १ मेपर्यंत माघारी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.