
नवी दिल्ली : जम्मू्- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेल्याने भारत सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारपासून बैठकांचे सत्र सुरू असतानाच, गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या ॲनेक्स इमारतीत जवळपास दोन तास चाललेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्याचे कबूल केले. त्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारला दहशतवादाविरोधात पुढील कारवाईसाठी पूर्ण पाठिंबा दिला असला तरी झालेल्या चुकीबद्दल खडे बोल सुनावले.
“जर काय चुकीचे घडलेच नसते तर आज आपण येथे जमलो नसतो. सुरक्षा व्यवस्थेत काहीतरी चूक घडली आहे, ती शोधून काढण्याची गरज आहे,” असे अमित शहा यांनी सांगितल्याचे समजते. संध्याकाळी ६ वाजता सुरू झालेली ही बैठक जवळपास दोन तास चालली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना घटनेबाबतची इत्यंभूत माहिती सांगितली. हल्ल्यानंतर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आली.
बैठकीदरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुरक्षा प्रोटोकॉलच्या अपयशाबद्दल केंद्र सरकारला प्रश्न विचारले. “पहलगाममध्ये सुरक्षा यंत्रणा कुठे होती? केंद्रीय राखीव पोलीस दल का तैनात करण्यात आले नाही? अशी प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी केली. त्यावर, पहलगाममधील बैसरन खोरे सुरू करण्याबाबतची कल्पना स्थानिक प्रशासनाने सुरक्षा यंत्रणांना दिली नव्हती, असे उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आले.
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, “भारताने दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढावे, यावर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत सरकारसोबत असल्याचे सर्व पक्षांनी म्हटले आहे. सरकार दहशतवादाविरोधात कोणतेही पाऊल उचलेल, त्याचे आम्ही समर्थन करू, असे सर्व पक्षांनी एकमुखाने म्हटले आहे. बैठक सकारात्मक पद्धतीने संपली.” या बैठकीत सुरक्षा यंत्रणेत चुका झाल्याबद्दल चर्चा करण्यात आली, यालाही रिजिजू यांनी दुजोरा दिला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली. तसेच राज्यसभेतील भाजप नेते जेपी नड्डा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाच्या सुप्रिया सुळे, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, अजित पवार गटाचे प्रफुल पटेल, सस्मित पात्रा (बीजेडी), लालू श्रीकृष्ण देवारायालू (टीडीपी), श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट), संजय सिंह (आप), सुदीप बंडोपाध्याय (तृणमूल काँग्रेस), प्रेमचंद गुप्ता (आरजेडी), टी. सिवा (डीएमके) आणि रामगोपाल यादव (समाजवादी पार्टी) हे नेते उपस्थित होते.
राहुल गांधी आज पहलगामला भेट देणार
विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे शुक्रवारी जम्मू-काश्मीरला जाणार असून पहलगाम येथील घटनास्थळी भेट देणार आहेत. सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारला विरोधी पक्षांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला.”