
नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला मुँहतोड जवाब देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत सशस्त्र दलांना प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य आणि अचूक वेळ ठरविण्याची पूर्ण मोकळीक देण्यात आली.
मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तिन्ही दलांचे प्रमुख हजर होते. देशाने दहशतवादाला चिरडून टाकण्याचा निर्धार केला असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. सशस्त्र दलांच्या कार्यक्षमतेबद्दल मोदी यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला. सशस्त्र दलांना प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य निश्चित करणे आणि अचूक वेळ याचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे, असे सूत्रांनी मोदींच्या हवाल्याने सांगितले.
या हल्ल्यामागील दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना हुडकून त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देण्याचा निर्धार मोदी यांनी हल्ल्यानंतर व्यक्त केला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली असून देशभरातून पाकिस्तानला अद्दल घडविण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
यापूर्वी, उरीमध्ये झालेला हल्ला आणि पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्ताना घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. पपहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. मंगळवारी सकाळ केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली त्याला तीनही निमलष्करी दलांचे ज्येष्ठ अधिकारी हजर होते.
भारतीय लष्कराचे संकेतस्थळ हॅक करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न
भारतीय लष्कर आपल्याविरोधात आक्रमक कारवाई करू शकते, या भीतीमुळे गाळण उडालेल्या पाकिस्तानकडून सायबर हल्ले सुरू झाले आहेत. पाकिस्तानने भारतीय लष्कराची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने भारतावर सायबर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारतीय लष्कराचे संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.
दोनदा सायबर हल्ला
पाकिस्तानने मागच्या दोन दिवसांत दोन वेळा भारतीय लष्कराच्या वेबसाइटवर सायबर हल्ला करून वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या तज्ज्ञांनी हे हल्ले हाणून पाडले आहेत. भारतानेही पाकिस्तानची भारतामध्ये डिजिटल कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातल्यानंतर आता भारताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा एम. आसिफ यांच्या एक्स अकाऊंटला भारतामध्ये ब्लॉक केले आहे. जम्मू-काश्मीरबाबत चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्याने तसेच भारतामध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
नर्मदेश्वर तिवारी हवाई दलाचे नवे उपप्रमुख
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेची चिंता वाढल्याने भारतीय लष्करात काही मोठे बदल करण्यात येत आहेत. हे बदल १ मे २०२५ पासून लागू होणार आहेत. हवाई दल आणि लष्कराला नवीन वरिष्ठ कमांडर मिळणार आहेत. एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख होणार आहेत, तर एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची सीआयएससी पदावर नियुक्ती होणार आहे.
एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांची भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते एअर मार्शल सुजित धारकर यांची जागा घेतील. धारकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. तिवारी यांना ३७ वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी कारगिल युद्धातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. लेफ्ट. जनरल प्रतीक शर्मा यांची नॉर्दन आर्मी कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते जम्मू-काश्मीर आणि लडाखसारख्या संवेदनशील भागांची कमान सांभाळतील. याआधी ते लष्कराचे उपप्रमुख होते आणि त्यांनी काश्मीरमध्ये ब्रिगेडचे नेतृत्वही केले आहे.
पाकिस्तान संरक्षण मंत्र्यांच्या 'एक्स' खात्यावरही बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांचे एक्स खाते ब्लॉक करण्याचा निर्णय मंगळवारी केंद्र सरकारने घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरबद्दल खोट्या आणि चुकीच्या बातम्या परवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. या सर्व यूट्यूब चॅनलचे सर्व मिळून ६३ दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. दरम्यान, या चॅनल्सवरून प्रक्षोभक आणि संवेदनशील कंटेंट प्रसारित केल्याप्रकरणी भारतात या चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात जर कोणी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे एक्स खाते पाहण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना कायदेशीररीत्या यांच्यावर भारतात बंदी घालण्यात आल्याचा संदेश दिसून येत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आसिफ यांनी अनेक धक्कादायक विधाने आणि दावे केले आहेत. दरम्यान, सोमवारी पाकिस्तानी मंत्र्यांनी दावा केला आहे की जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर हल्ला करणार हे निश्चित असल्याचे म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे, तसेच या हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी मागणी केली जात आहे.
मृताच्या कुटुंबीयांना ५० लाख, वारसांना सरकारी नोकरी
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आर्थिक मदत, पाल्याच्या शिक्षणासाठी मदत आणि वारसांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या वारसांना थेट शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच फडणवीस यांनी जाहीर केला होता.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा - खर्गे, राहुल
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. सध्याच्या घडीला ऐक्य आणि एकता गरजेची असल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलाविणे महत्त्वाचे आहे असे विरोधी पक्षांना वाटते, असे खर्गे आणि राहुल गांधी यांनी मोदींना पाठिवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनीही अशीच मागणी केली आहे.