पाकविरुद्ध ठोस पुरावे; ‘एनआयए’च्या चौकशीत लष्कर-ए-तोयबा, आयएसआय कनेक्शन उघड

‘एनआयए’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जणांचा जीव घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा कट हा ‘लष्कर-ए-तोयबा’ने आखला आणि त्यासाठी ‘आयएसआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते.
पाकविरुद्ध ठोस पुरावे; ‘एनआयए’च्या चौकशीत लष्कर-ए-तोयबा, आयएसआय कनेक्शन उघड
Published on

नवी दिल्ली : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) केला जात असून दहशतवादी हल्ल्याबाबतच्या प्राथमिक अहवालात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ (एलईटी) यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

‘एनआयए’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जणांचा जीव घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा कट हा ‘लष्कर-ए-तोयबा’ने आखला आणि त्यासाठी ‘आयएसआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते. तसेच हा कट ‘लष्कर-ए-तोयबा’च्या पाकिस्तानमधील मुख्यालयात रचण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

टेहळणीसाठी मदत

दहशतवादी हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी भारतीय हद्दीत घुसले होते आणि त्यांना ‘ओव्हरग्राऊंड वर्कर्स’ यांच्या नेटवर्ककडून मदत करण्यात आली. ज्यामध्ये स्थानिक ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ ज्यामध्ये राहण्याची जागा, रस्त्यांबद्दल माहिती आणि हल्ल्याआधी संबंधित ठिकाणांची टेहळणी करण्यासाठी मदत देण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे.

हल्ल्याच्या काही दिवसांपर्यंत या भागात सॅटेलाइट फोनच्या हालचाली वाढल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच बैसरन आणि त्याच्या आसपास किमान तीन सॅटेलाइट फोन कार्यरत होते आणि त्यापैकी दोनचे सिग्नल ट्रेस करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणा आणि ‘एनआयए’कडून एकूण २,८०० लोकांची चौकशी करण्यात आली आहे. २ मेपर्यंत १५० हून अधिक जण पुढील चौकशीसाठी कोठडीत आहेत. यामध्ये संशयित ‘ओजीडब्ल्यू’ qआणि बंदी घातलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ यासारख्या संघटनांशी संबंधित असलेल्यांचा समावेश आहे

हल्ल्याची टाइमलाईन

दहशतवाद्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पहलगामच्या आसपासच्या प्रमुख वाहतूक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज ‘एनआयए’ने ताब्यात घेतले आहे. लगतच्या सुरक्षा चौक्यांवरील डेटाचे देखील ‘पॅटर्न मॅपिंग’साठी विश्लेषण केले जात आहे. पीडितांचे कुटुंबीय, पोनी ऑपरेटर्स, अन्नपदार्थ विक्रेते यांचा समावेश असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून हल्ल्याची टाइमलाईन तयार केली जात आहे.

एनआयएच्या तपासात असे आढळून आले आहे की, या भयानक हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात त्यांची शस्त्रे लपवली होती. यासाठी त्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर्सकडून मदत मिळाली होती. ओव्हरग्राऊंड वर्कर्सनी दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर महत्त्वाची माहिती पुरवल्याचा आरोप आहे. ‘एनआयए’च्या सूत्रांनुसार, दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपले असण्याची शक्यता आहे.

हल्ल्याबाबत सातत्याने सूचना

या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांचा प्रामुख्याने हात होता, हाश्मी मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई, हे दोघे पाकिस्तानी नागरिक असल्याचे उघड झाले आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या ऑपरेटिव्हच्या चौकशीत दोन्ही दहशतवादी हे पाकिस्तानातील हँडलर्सशी सतत संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्यांना हल्ल्याची वेळ आणि अंमलबजावणी याबाबत सातत्याने सूचना दिल्या जात होत्या, असेही उघड झाले आहे.

३-डी मॅपिंग

‘एनआयए’ने मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक आणि ‘इलेक्ट्रॉनिक’ डेटा गोळा केला आहे. हल्ला झाला त्या ठिकाणाहून ४० कार्टेजेस ताब्यात घेण्यात आली आहेत आणि ती बॅलेस्टिक आणि केमिकल विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहेत. चौकशीत हल्ला झालेल्या ठिकाणाचे ‘३डी मॅपिंग’देखील करण्यात आले आहे. याबरोबरच खोऱ्यातील जवळपासच्या मोबाइल टॉवरचा ‘डम्प डेटा’देखील मिळवण्यात आला आहे.

शाहबाज शरीफ यांच्या यूट्यूब चॅनलवर घातली बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या यूट्यूब चॅनलवर भारतात बंदी घालून त्यांना चांगलाच दणका दिला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून भारताने पाकिस्तानविरुद्ध काही कठोर निर्णय घेतले आहेत.

दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात लपविली होती शस्त्रे

पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांची हत्या करणारे पाकिस्तानस्थित दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधील त्यांच्या सूत्रांच्या सतत संपर्कात होते आणि त्यांनी बेताब खोऱ्यात शस्त्रे लपवून ठेवली होती, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in