हेच ते क्रूरकर्मा! सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे फोटो-स्केच जारी; हल्ल्यावेळी घातले होते 'बॉडी कॅम' आणि 'हेल्मेट-माउंटेड कॅमेरे'?

Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांकडे लष्करी दर्जाची शस्त्रे आणि प्रगत संवाद उपकरणे होती. ते पूर्ण तयारीनिशी आले होते. गोळ्या-बंदूकांसोबतच सुका मेवा आणि औषधांचाही साठा करून ठेवला होता. पण, तपासादरम्यान समोर आलेली गंभीर बाब म्हणजे दहशतवाद्यांनी 'बॉडी कॅम' आणि 'हेल्मेट-माउंटेड कॅमेरे' घातले होते. याचा अर्थ संपूर्ण हल्ल्याचा...
हेच ते क्रूरकर्मा! सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे फोटो-स्केच जारी; हल्ल्यावेळी घातले होते 'बॉडी कॅम' आणि 'हेल्मेट-माउंटेड कॅमेरे'?
Published on

जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि.२२) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संशयित दहशतवाद्यांचे फोटो आणि स्केचेस जारी केले आहेत. 'इंडिया टूडे'ने याबाबत वृत्त दिले असून त्यानुसार, या हल्ल्यामागे असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख देखील पटली आहे. त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमान शहा आणि अबू तल्हा अशी आहेत.

किमान ५ ते ६ दहशतवाद्यांनी 'कॅमोफ्लाज' पोशाख आणि कुर्ता-पायजमा परिधान केला होता. 'मिनी स्वित्झर्लंड' अशी ओळख असलेल्या जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन भागात दाट देवदाराच्या जंगलातून ते अचानक बाहेर आले आणि AK-47 रायफल्सने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी गटात काही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश होता, जे हल्ल्याच्या काही दिवस आधीच काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करून आले होते. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून लष्कर-ए-तोयबाचा (LeT) वरिष्ठ कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद याची ओळख पटली आहे, असे गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. सैफुल्ला कसुरी यानेच या हल्ल्याची आखणी केली.

दहशतवाद्यांनी घातले होते बॉडी कॅम आणि हेल्मेट-माउंटेड कॅमेरे

प्राथमिक फॉरेन्सिक तपासणी आणि हल्ल्यातून वाचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, दहशतवाद्यांकडे लष्करी दर्जाची शस्त्रे आणि प्रगत संवाद उपकरणे (advanced communication devices) होती. यावरून त्यांना बाह्य स्तरावरून लॉजिस्टिक आणि तांत्रिक मदत मिळाल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. तपासादरम्यान समोर आलेली अजून एक गंभीर बाब म्हणजे दहशतवाद्यांनी बॉडी कॅम आणि हेल्मेट-माउंटेड कॅमेरे घातले होते. याचा अर्थ संपूर्ण हल्ल्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे कॅमेरे युद्धजन्य परिस्थितीत वापरले जातात. म्हणजे ही घटना फक्त हल्ल्यासाठी नव्हे तर प्रचार करण्याच्या उद्देशाने नियोजित करण्यात आली असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. यावरुन तपास यंत्रणांनी हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा हात असल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे, आणि या दिशेने तपास अधिक गतीने सुरू आहे. हल्ल्याचे ज्या प्रकारे अचूक नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली, त्यावरून हे प्रशिक्षित 'हँडलर्स'च्या मार्गदर्शनाखाली रचलेले ऑपरेशन असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दहशतवाद्यांनी आधी रेकी केली, नंतर हल्ला-

दहशतवादी पूर्ण तयारीनिशी आले होते, अशी माहिती तपास यंत्रणांकडून समोर आली आहे. त्यांनी गोळ्या-बंदूकांसोबतच सुका मेवा आणि औषधांचाही साठा करून ठेवला होता. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, हल्ल्याच्या आधी या दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या मदतीने पहलगाम परिसराची रेकी केली होती. यामुळे त्यांना पर्यटकांची हालचाल, बैसरन भागातील रचना आणि सुरक्षेची पातळी याची अचूक माहिती मिळाली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, हल्लेखोरांपैकी दोन दहशतवादी पश्तो भाषेत बोलत होते, ज्यावरून ते पाकिस्तानी असल्याचा स्पष्ट अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित दोन दहशतवादी स्थानिक होते, ज्यांची नावे आदिल आणि आसिफ अशी असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघे अनुक्रमे बिजबेहरा आणि त्राल येथील रहिवासी आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांचे डिजिटल फूटप्रिंट्स पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद आणि कराचीमधील 'सेफ हाउसेस'शी संबंधित असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील दोन नागरिक (संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे), पनवेलमधील दिलीप देसले आणि ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे. मृतांचे पार्थिव शरीर मुंबई आणि पुण्यात विमानाने आणले जाणार आहे. यापैकी कौस्तुभ आणि संतोष आपल्या कुटुंबियांसोबत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. तर, मृत दिलीप देसले आपल्या पत्नीसह (ऊषा देसले )निसर्ग ट्रॅव्हल्सच्या बसमधून, पनवेल येथून एकूण ३९ पर्यटकांसह जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. डोंबिवलीतील संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी हे तिघे एकत्र आपल्या कुटुंबीयांसोबत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते, असे समजते.

logo
marathi.freepressjournal.in