पहलगाम हल्ल्याचा LIVE VIDEO समोर; 'झिपलाइन' करताना पर्यटकाने टिपला थरार, ‘अल्लाहू अकबर’ म्हणणारा ऑपरेटर रडारवर!

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अहमदाबादच्या ऋषी भट यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावेळी डोळ्यादेखत घडलेली घटना देखील ऋषी भट यांनी सांगितली.
पहलगाम हल्ल्याचा LIVE VIDEO समोर; 'झिपलाइन' करताना पर्यटकाने टिपला थरार, ‘अल्लाहू अकबर’ म्हणणारा ऑपरेटर रडारवर!
Published on

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अहमदाबादच्या ऋषी भट यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. घटनास्थळी असलेल्या झिपलाइनचा आनंद घेत असताना ऋषी भट यांनी हा व्हिडिओ शूट केला होता. झिपलाइनवरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाताना उंचीवर असल्यामुळे जमिनीवर झालेला गोळीबार आणि पर्यटकांची धावपळ त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

झिपलाइनवेळी ऋषी हवेत असताना खाली जमिनीवर दहशतवादी बेछूट गोळीबार करत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. घाबरलेले पर्यटक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत. धावताना एका व्यक्तीला गोळी लागते आणि तो जमिनीवर कोसळतो. यावेळी डोळ्यादेखत घडलेली घटना ऋषी भट यांनी सांगितली.

दहशतवादी हल्ल्याची कल्पना नव्हती

सुरूवातीला गोळीबाराचा आवाज ऐकल्यावरही हा दहशतवादी हल्ला असल्याचं ऋषी भट यांना वाटलं नव्हतं. ते व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आणि झिपलाइनचा आनंद घेण्यात मग्न होते. त्यामुळे व्हिडिओ काढताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं. व्हिडिओत दिसणाऱ्या दृश्यांवरून अनेक पर्यटकांनाही सुरूवातीला हा दहशतवादी हल्ला असल्याची जाणीव नव्हती, असे स्पष्ट होते. त्यामुळे काहीजण सहज वावरताना, निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेतानाही दिसतात. मात्र, जसजसे ऋषी खाली येतात, तसतसे त्यांना काहीतरी विचित्र घडत असल्याची जाणीव होते. अखेरीस काही अंतर बाकी असताना हवेतच बेल्ट खोलून ते उडी मारतात.

मी माझ्या धुंदीत होतो, दहशतवादी हल्ल्याची कल्पना नव्हती

ऋषी भट म्हणाले, "माझा मुलगा आणि पत्नी खाली पोहोचले होते आणि मी झिपलाइनवर होतो, तेव्हा पहिली गोळी झाडली गेली. पण मी माझ्या धुंदीत होतो. मजा घेत होतो. साधारण २० सेकंदांनंतर खाली गोळीबार सुरू आहे आणि लोक मरत आहेत, हे मला कळले. ५-६ लोकांना गोळी मारल्याचं मी बघितलं. त्यानंतर इथे दहशतवादी हल्ला झाला असल्याचं माझ्या लक्षात आलं, असे त्यांनी सांगितलं.

बेल्ट खोलून उडी मारली आणि पत्नी-मुलाला घेऊन पळालो

खाली माझ्या पत्नीसमोर दोन व्यक्तींना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. माझी पत्नी आणि मुलगा ओरडत होते. मी हवेतच बेल्ट खोलून उडी मारली आणि पत्नी आणि मुलाला घेऊन पळायला लागलो. त्यानंतर काही लोक एका ठिकाणी लपल्याचं दिसलं, ते बघून आम्हीही तिथे लपलो.

अन् पुन्हा सुरू झाला गोळीबार

गोळ्यांचा आवाज थोडा कमी झाल्यावर ८-१० मिनिटांनी बाहेर पडलो आणि मेन गेटच्या दिशेने पळालो. खूप लोकं पळत होते आणि तेव्हाच पुन्हा गोळीबार सुरू झाला आणि ४-५ लोकांना गोळ्या लागल्या. आमच्यासमोर किमान १५-१६ पर्यटकांना गोळ्या घातल्या. मेन गेटवर पोहोचल्यावर स्थानिक लोक आधीच निघून गेले होते. पण घोड्यावाल्याने आम्हाला मदत केली. पुढे भारतीय लष्कराने आम्हा सर्व पर्यटकांना संरक्षण दिले...अवघ्या १८-२० मिनिटांत भारतीय लष्कराने सर्व परिसरावर ताबा मिळवला. मी भारतीय लष्कराचा खूप आभारी आहे," असे ऋषी भट यांनी भावनिक होत सांगितले. "तिथे खालच्या भागात आणि जंगलात लष्कराची उपस्थिती होती, पण मुख्य ठिकाणी लष्कराचा एकही अधिकारी नव्हता. मुख्य गेटजवळ जम्मू-काश्मीर पोलीस आणि तीन सुरक्षा रक्षक होते," अशीही माहिती त्यांनी दिली. ऋषी भट यांच्या म्हणण्यानुसार, मैदानात दोन दहशतवादी थेट लोकांवर गोळ्या झाडत होते, तर काही जण झुडपांमध्ये लपलेले होते. एकूण ५ ते ६ दहशतवादी या हल्ल्यात सामील होते, असे त्यांनी सांगितले.

'अल्लाहू अकबर' म्हणणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरवर व्यक्त केला संशय

ऋषी भट यांनी यावेळी झिपलाइन ऑपरेटरवरही संशय व्यक्त केला. झिपलाइनवरुन मला सोडण्याआधी ऑपरेटर तीन वेळा अल्लाहु अकबर असं म्हणाला, इकडे तिकडे बघितलं आणि नंतर मला सोडलं, त्यानंतरच गोळीबार सुरू झाला, असे ते म्हणाले. "माझ्यापूर्वी ९ लोकांनी झिपलाइन केली, पण ऑपरेटर काहीच बोलला नव्हता. मी झिपलाइन करत असताना तो तीन वेळेस 'अल्लाहू अकबर' असे म्हटला आणि त्यानंतरच गोळीबार सुरू झाला. त्यामुळे त्या व्यक्तीवर मला शंका आहे. तो दिसायला एक सामान्य काश्मिरी होता," असे भट्ट म्हणाले.

झिपलाइन ऑपरेटरची चौकशी सुरू

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, झिपलाइन ऑपरेटरने "अल्लाहू अकबर" असे म्हटल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनाच चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आता झिपलाइन ऑपरेटरला पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

दरम्यान, पहलगाममधील या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. सीमेलगत दोन्ही बाजूंनी लष्करी हालचाली सुरू झाल्या असून, परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.

logo
marathi.freepressjournal.in