पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला; बेछूट गोळीबारात २७ पर्यटक ठार; ‘टीआरएफ’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

अमरनाथ यात्रेला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी राहिला असतानाच जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २७ पर्यटक ठार झाले असून ठार झालेल्यांमध्ये दोन विदेशी नागरिक व दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.
पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला; बेछूट गोळीबारात २७ पर्यटक ठार; ‘टीआरएफ’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
Published on

श्रीनगर : अमरनाथ यात्रेला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी राहिला असतानाच जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २७ पर्यटक ठार झाले असून ठार झालेल्यांमध्ये दोन विदेशी नागरिक व दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटक ठार झाले असून अन्य काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा एक गट 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

बायसरन या केवळ पायवाट असलेल्या ठिकाणी पर्यटक गेले होते, तेव्हा नजीकच्या खोऱ्यातून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यामध्ये २७ पर्यटक ठार झाले असून अन्य काही जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पहलगाममधील पर्वतावर ट्रेकिंगसाठी पर्यटक जातात. हिरव्यागार कुरणांमुळे या भागाला 'मिनी स्वित्झर्लंड' असे म्हणतात आणि तेथेच हा दहशतवादी हल्ला झाला आहे. लपलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.

या हल्ल्यामध्ये गुजरातमधील तीन आणि कर्नाटकमधील दोन पर्यटक जखमी झाले आहेत. रीनो पांडेय, डॉक्टर परमेश्वर, बीनो भट्ट, माणिक पटेल यांची नावे जखमींच्या यादीमध्ये आहेत. एका महिला पर्यटकाने काश्मीर पोलिसांना दूरध्वनी करून या हल्ल्याची माहिती दिली.

घटनास्थळावरील हल्ल्याच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक जण रक्ताने माखलेले तर काही जण निपचित पडलेले दिसत असून एक महिला पयर्टक आक्रोश करीत आपल्या आप्तेष्टांचा शोध घेत असताना दिसत आहे.

दहशतवादी साधारणत: पर्यटकांवर हल्ला करत नाहीत, कारण याचा परिणाम स्थानिक रहिवाशांच्या व्यवसायावर होतो. त्यामुळे प्रथमच पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

पुण्यातील पर्यटकांना नावे विचारून गोळ्या घातल्या

हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी नाव व धर्म विचारून गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या. पुण्यातील पाच जणांचे कुटुंब पहलगामला पर्यटनासाठी गेले होते. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. पर्यटकांसह हे कुटुंब काश्मिरी पोषाख घालून फोटो काढत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले. या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरून त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे, तर दुसरा पुरुष देखील गंभीर जखमी आहे. या कुटुंबासह पुण्यातील आणखी काही पर्यटकदेखील या हल्ल्यात जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे. तसेच एका नवीन लग्न झालेल्या जोडप्यातील पुरुषालाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या.

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटक दिलीप डिसले आणि अतुल मोने यांचा मृत्यू झाला, तर माणिक पटेल (पनवेल) आणि एस. भालचंद्र राव हे दोघे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जा, मोदींना जाऊन सांग...

कर्नाटकातील उद्योगपती मंजुनाथ आणि त्यांची पत्नी पल्लवी आपल्या लहान मुलांसह पहलगामला गेले होते. पल्लवी यांनी सांगितले की, आम्ही तिघे जण मी, माझे पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो. दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी दहशतवाद्यांनी हल्ला केला. तिथे माझ्या डोळ्यासमोर पतीला मारुन टाकले. दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य बनवले. तीन ते चार लोकांनी आमच्यावर हल्ला केला. मी त्यांना म्हटले, तुम्ही माझ्या नवऱ्याला आधीच मारले आहे, आता मलाही मारून टाका. तर त्यातला एक दहशतवादी म्हणाला, मी तुला मारणार नाही, जा, मोदींना हे सांग. पल्लवी यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांच्या पतीचा मृतदेह लवकरात लवकर शिवमोगा येथे आणावा, अशी मागणी केली. त्यानुसार हेलिकॉप्टरने मृतदेह आणि जखमींना खाली आणण्यात आल्याची माहिती आहे.

दहशतवाद्यांना सोडणार नाही - पंतप्रधान

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला. मोदी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हणाले, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो, अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जाईल. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

पोकळ दावे नकोत - राहुल गांधी

या भ्याड दहशतवादी हल्ल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया हँडल ‘एक्स’वर लिहिले की, पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी सरकारने आता जबाबदारी घ्यावी आणि ठोस पावले उचलावीत, जेणेकरून भविष्यात अशा क्रूर घटना घडणार नाहीत.

खर्गे यांच्याकडून निषेध

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निष्पाप पर्यटकांवरील हल्ल्याचा निषेध केला असून हा मानवतेवरील कलंक असल्याचे म्हटले आहे. देशाची सुरक्षा सर्वोच्च असून केंद्र सरकारने तातडीने योग्य त्या उपाययोजना आखाव्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल

पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. शहा यांनी सोदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती दिली. श्रीनगर येथे आपण सर्व यंत्रणांशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेणार आहोत. आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही केल्याचे शहा म्हणाले.

दोन परदेशी पर्यटकांचाही मृत्यू

दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात फक्त भारतीयच नव्हे तर दोन परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी इटलीचा एक व इस्त्रायलच्या एका पर्यटकाला ठार केले. \

आपत्कालिन क्रमांक जाहीर

हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने पर्यटकांसाठी आपत्कालिन क्रमांक जाहीर केले आहेत. ७७८०८८५७५९/ ६००६३६५२४५/९६९७९८२५२७.

logo
marathi.freepressjournal.in