
श्रीनगर : पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली असून स्थानिकांकडून हल्ल्याची माहिती गोळा केली जात आहे. हल्ल्यानंतर तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यात आली होती. मात्र आता व्यापक तपासानंतर पहलगाममध्ये हल्ला करणारे ते नव्हतेच, अशी माहिती समोर आली आहे.
दहशतवाद्यांनी हल्ल्याआधी परवेझ अहमद जोथार आणि हिलपार्क येथील बशीर अहमद जोथार यांच्या घरी जेवण केले होते तसेच आश्रयही घेतला होता. या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून वेगळीच माहिती ‘एनआयए’ला मिळाली आहे. हल्ल्यानंतर रेखाचित्रे जारी करण्यात आली, त्यात पाकिस्तानच्या हाशिम मुसा, अली भाई उर्फ तल्हा आणि हुसेन ठोकर यांचा समावेश होता. पण आता ‘एनआयए’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखाचित्रातील तिघांचाही पहलगाम हल्ल्याशी संबंध नव्हता. हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवादी दुसरेच आहेत.
पहलगाम हल्ल्यात सुलेमान शाह या दहशतवाद्याचा समावेश आहे. श्रीनगर-सोनमर्ग महामार्गावरील बोगद्याचे बांधकाम करणारे हे कर्मचारी होते. “नवीन फोटो अनेक वेगवेगळ्या साक्षीदारांना दाखवण्यात आले. गुन्हा घडला त्यावेळी उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांची ओळख त्यांनी पटवली आहे. सुलेमान शाह याचा त्यात समावेश असल्याचे साक्षीदारांनी ‘एनआयए’ला सांगितले आहे,” असे सूत्रांकडून समजते.