
नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास मोठा अपघात झाला. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छत कोसळलं. या अपघातात रमेश कुमार (वय ४५) या कॅब चालकाचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी आपल्याला बापाचा चेहराही पाहू दिला नाही, सकाळी येऊन मृतदेह घेऊन जा, असा धक्कादायक खुलासा मृत कॅब चालकाच्या मुलानं केला आहे.
सकाळी येऊन मृतदेह घेऊन जा...
मीडिया हाऊस आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार मृत रमेश कुमार यांचा मुलगा रवींद्र याने सांगितले की, सकाळी ८.३० वाजता आम्हाला पोलिसांमार्फत कळाले की, माझ्या वडिलांचा अपघात झाला असून ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी लगेच येण्यास सांगितले. सकाळी ट्रॅफिक जॅम होता, अर्ध्या वाटेने चालत गेलो, मग कसे तरी पोहोचलो. रुग्णालयात पोहोचल्यानंतर पोलिसांनी आम्हाला २ तास तिथे बसवून ठेवलं. त्यानंतर सकाळी येऊन मृतदेह घेऊन जा, असं सांगितले. आम्ही त्यांचा चेहराही पाहिला नाही, असे रवींद्रने सांगितले.
नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी...
रमेश कुमार यांचा मुलगा रवींद्र कुमार यांने सांगितले की, रात्री ३ वाजता त्यांच्या वडिलांचं भावाशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनी सांगितले की, ते फरिदाबादहून विमानतळावर गेले होते. ते ४ वर्षांपासून कॅब चालवत होते. रवींद्र म्हणाले की, कुटुंबात आई, २ बहिणी आणि २ भाऊ आहेत. कुटुंबाचा खर्च वडील एकट्यानेच चालवत होते. यानंतर रवींद्र यांनी नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणीही सरकारकडे केली आहे.
घर कसं चालणार?
रमेश कुमार यांचे भाऊ राजेश कुमार यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. कुटुंबात दोन मुली आहेत, त्यांचे लग्न व्हायचं आहे, त्यांचं लग्न कसं होणार याची आम्हाला चिंता आहे. घर कसं चालणार? ते म्हणाले की आमच्याकडे कोणतेही काम नाही. आपण गाडी चालवतो आणि पोट भरतो. ही घटना अत्यंत दु:खद असल्याचं त्यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या विमानतळावरही अशी घटना घडली तर माणूस काम कसं करेल? राजेश कुमार म्हणाले की, अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत ५-६ वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी आम्हाला आमच्या भावाचा चेहरा पाहू दिला नाही. पोलिसांनी आम्हाला आत जाऊ दिले नाही, असंही ते म्हणाले.
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल...
टर्मिनल-1 दुर्घटनेबाबत पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या डोमेस्टिक एअरपोर्ट पोलिस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, आयपीसी कलम ३०४A (निष्काळजीपणामुळे मृत्यू), ३३७ (इतरांच्या जीवाला आणि वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आज पहाटे ५.५२च्या सुमारास पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळाली की, ६ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष यादव (वय २८), दशरथ (वय २५), अरविंद (वय ३४), साहिल, योगेश अशी जखमींची नावे आहेत.