दिल्लीतील अलीपूर भागात रंगाच्या कारखान्याला आग; ११ ठार

दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग लागल्याचा कॉल आला आणि २२ अग्निशामक गाड्या तेथे दाखल झाल्या
दिल्लीतील अलीपूर भागात रंगाच्या कारखान्याला आग; ११ ठार

नवी दिल्ली : दिल्लीबाहेरच्या अलीपूर या भागातील एका रंगाच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या आगीत ११ जण मरण पावले. गुरुवारी संध्याकाळी ही आग लागली होती.

अलीपूरच्या दयालपूर मार्केटमध्ये रासायनिक गोदामे असलेल्या कारखान्यात शुक्रवारी आणखी ४ मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या ११वर गेली आहे. यात १० पुरुषांचा व एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती अग्निशमन सेवा अधिकाऱ्याने दिली.

आग स्फोटानंतर लागली व काही वेळातच ती औषध पुनर्वसन केंद्र आणि आठ दुकानांसह जवळपासच्या इमारतींमध्ये पसरली. हा कारखाना हरयाणातील सोनीपत येथील अखिल जैन चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारखान्याच्या मालकाविरुद्ध कलम ३०४ आणि ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग लागल्याचा कॉल आला आणि २२ अग्निशामक गाड्या तेथे दाखल झाल्या. रात्री ९ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली.

बाबू जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. दिल्ली अग्निशमन सेवेचे प्रमुख अतुल गर्ग म्हणाले की, स्फोटामुळे इमारत कोसळली आणि कामगार कारखान्यात अडकले आणि त्यांना वाचवता आले नाही.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गोदामांमध्ये साठलेल्या रसायनांमुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे. ज्योती (४२), दिव्या (२०), मोहित सोलंकी (३४) आणि पोलीस हवालदार करंबीर (३५) अशी चार जखमींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त (बाह्य-उत्तर) रवी कुमार सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळी असलेल्या पोलीस पथकाने शेजारच्या 'नशा मुक्ती केंद्रा'सह इतर अनेक इमारतींमध्ये आग पसरल्याचे पाहिले, जेथे चार-पाच लोक अडकले होते.

अलीपूर पोलीस ठाण्यात तैनात आमचे हवालदार करंबीर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून 'नशा मुक्ती केंद्रा'च्या टेरेसवर धाव घेतली आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्यात यश मिळविले. त्याला भाजण्यासह जखमा झाल्या आणि आता त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in