पाकिस्तानने भारताला धोकाच दिला; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप

माझ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मी निमंत्रण दिले. पण, शांततेचा प्रत्येक प्रयत्न त्यांनी शत्रुत्वात बदलला. पाकिस्तानने प्रत्येक वेळी भारताला धोकाच दिला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. अमेरिकेतील एआय संशोधक लेक्स फ्रिडमन यांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी अनेक प्रश्नांवर मनमोकळी उत्तरे दिली.
पाकिस्तानने भारताला धोकाच दिला; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
Published on

नवी दिल्ली : माझ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मी निमंत्रण दिले. पण, शांततेचा प्रत्येक प्रयत्न त्यांनी शत्रुत्वात बदलला. पाकिस्तानने प्रत्येक वेळी भारताला धोकाच दिला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

अमेरिकेतील एआय संशोधक लेक्स फ्रिडमन यांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी चीन, ट्रम्प, जागतिक राजकारण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैयक्तिक जीवन आदी प्रश्नांवर मनमोकळी उत्तरे दिली.

ते म्हणाले की, पाकिस्तानातील जनतेला शांतता हवी आहे. एक दिवस पाकिस्तानला सद‌्बुद्धी होईल व तो शांततेच्या मार्गावर चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चीनबाबत मोदी म्हणाले की, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबतच्या माझ्या बैठकीनंतर सीमेवर परिस्थिती सामान्य बनली आहे. २०२० पूर्वीची स्थिती पुन्हा येण्यासाठी आम्ही काम करत आहोत. परस्पर विश्वास निर्माण होण्यास वेळ लागेल. पण, चर्चेला आम्ही तयार आहोत. संघर्षाऐवजी चांगल्या स्पर्धेची आवश्यकता आहे. २१ वे शतक आशियाचे असून भारत व चीनने एकमेकांशी स्पर्धा केली पाहिजे, संघर्ष नव्हे, असे मोदी म्हणाले.

कोविडने प्रत्येक देशाची सीमा पुसून टाकली. त्यातून काहीही शिकण्याऐवजी जग अधिक अलग झाले आहे. जागतिक नियम लागू करण्यात संयुक्त राष्ट्र संघासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना अपयशी ठरल्या आहेत. जे लोक कायदा धाब्यावर बसवतात, त्यांना कोणताही परिणाम भोगावा लागत नाही, असे ते म्हणाले.

गोध्रा दंगलीनंतर गुजरातमध्ये शांतता पसरली

गुजरातमध्ये २००२ पूर्वी २५० हून अधिक दंगली झाल्या होत्या. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा हत्याकांड झाले. २००२ ची दंगल दु:ख देणारी होती. मात्र, त्यानंतर राज्यात पूर्णपणे शांतता पसरली. सरकारविरोधात अनेक आरोप झाले. पण, न्यायपालिकेने दोन वेळा तपास करून निर्दोष सोडले, असे मोदी म्हणाले.

संघाने देशासाठी जगणे शिकवले

संघाने आम्हाला शिकवले त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे, जे काम कराल ते उद्देशपूर्ण करा. शिक्षण घेत असल्यास राष्ट्राला योगदान देण्यासाठी आवश्यक ते शिक्षण घ्या. शरीर मजबूत करत असल्यास राष्ट्राची सेवा करण्यासाठी ते करा, असे आम्हाला शिकवले गेले, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प स्वत:चे निर्णय स्वत: घेतात!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंमतवान असून ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात भरलेल्या स्टेडियममध्ये मी ट्रम्प यांच्याजवळ गेलो. म्हटले, आपण दोघे एकत्रितपणे या स्टेडियमला फेरी मारूया. अमेरिकेच्या जीवनात राष्ट्राध्यक्ष हजारो लोकांच्या गर्दीत चालणे ही बाब अशक्यप्राय आहे. पण, ट्रम्प माझ्याबरोबर चालले. त्यांच्याकडे हिंमत असून ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात, असे मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in