इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा इराणमध्ये प्रतिहल्ला; अनेक दहशतवादी मारल्याचा केला दावा

गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या 'मार्ग बार सरमाचार' नावाच्या या ऑपरेशनमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, याबाबत कोणतीही आकडेवारी दिली नाही.
इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा इराणमध्ये प्रतिहल्ला;  अनेक दहशतवादी मारल्याचा केला दावा

इराणने मंगळवारी पाकिस्तानवर केलेल्या प्राणघातक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी (18 जानेवारी) इराणच्या हद्दीतील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला आहे. पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी सकाळी 'मार्ग बार सरमाचार' या अभियानाअंतर्गत कारवाई सुरू करून इराणमध्ये आश्रय घेत असलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले असून यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला आहे.

पाकिस्तानने याबाबत एक निवेदन जारी केले असून यात म्हटले आहे की , "गुरुवारी सकाळी पाकिस्तानने इराणच्या सिस्तान-ओ-बलुचिस्तान प्रांतातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर नियोजित हल्ले केले. गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या 'मार्ग बार सरमाचार' नावाच्या या ऑपरेशनमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, याबाबत कोणतीही आकडेवारी दिली नाही.

पाकिस्तानने इराणमध्ये सरमाचार या दहशतवादी संघटनांना आश्रय देण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या दहशतवाद्यांची उपस्थिती आणि कारवायांचे ठोस पुरावे असलेले अनेक डॉसियरही पाकिस्तानने शेअर केले आहेत. परंतु, आमच्या पुराव्यांवर कारवाई न झाल्याने सरमाचार दहशतवादी निर्दोष पाकिस्तानी नागरिकांचे रक्त सांडत राहिले. त्यामुळे आज सकाळची कारवाई करण्यात आली. ही कृती सर्व धोक्यांपासून आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याच्या पाकिस्तानच्या दृढ संकल्पाचा प्रयत्न आहे. या अत्यंत गुंतागुंतीच्या ऑपरेशनची यशस्वी अंमलबजावणी ही पाकिस्तानी सशस्त्र दलांच्या प्रयत्नांची साक्ष आहे. पाकिस्तान आपल्या लोकांची सुरक्षा आणि सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहील, असेही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, इराण इंटरनॅशनल न्यूजनुसार, सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील एका स्थानिक अधिकाऱ्याने सारवान शहराजवळ अनेक स्फोट झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच, या प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर जनरल यांनी इराणच्या सरकारी टीव्हीला सांगितले की, पाकिस्तानने सीमेवरील एका गावावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन महिला आणि चार मुलांचा मृत्यू झाला. मृतांपैकी कोणीही इराणी नागरिक नसल्याचेही ते म्हणाले.

तर, सारवान शहरातील शमसार नावाच्या गावात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला झाला असून त्यात सात जणांचा मृत्यू झाल्याचे इराणच्या अधिकृत मेहर वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in