पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर संशयित घुसखोराला अटक

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा कट उधळून लावण्यात आला. बीएसएफने एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांच्या मोठ्या गटाला भारतात घुसवण्याची योजना आखत होता.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

जम्मू : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा कट उधळून लावण्यात आला. बीएसएफने एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांच्या मोठ्या गटाला भारतात घुसवण्याची योजना आखत होता.

जम्मू जिल्ह्यातील प्रागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर ही अटक करण्यात आली. संशयित दहशतवाद्याकडे चिनी बनावटीचे शस्त्र असल्याचा संशय आहे. संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर ‘बीएसएफ’ने प्रागवाल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे.

सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की जम्मू-काश्मीरमधून अनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानात पळून गेलेल्या दहशतवादी कमांडरना परत भारतात पाठवण्याचा प्रयत्न आयएसआयकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच बीएसएफच्या महानिरीक्षकांनी सांगितले की, पाकिस्तानी हद्दीतील दहशतवादी लाँच पॅड पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बीएसएफ अधिक सतर्क झाले आहे.

पाकिस्तानमध्ये ६ नोव्हेंबरला लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्यात एक मोठी बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे. जिहादींच्या या बैठकीचे विशेष फोटोदेखील प्रसिद्ध करण्यात आले. लष्करचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी याच्यासह अनेक जैश कमांडर या बैठकीत उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरपूर्वी बहावलपूरमध्येही अशीच एक बैठक झाल्याची माहिती आहे.

logo
marathi.freepressjournal.in