
इस्लामाबाद : भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. भारताने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. तरीही पाकिस्तानची खोड मोडलेली दिसत नाही. पाकिस्तानने आपल्या अण्वस्त्र साठ्यांचे आधुनिकीकरण जोरात सुरू केले आहे, असा धक्कादायक निष्कर्ष आपल्या गुप्त अहवालात अमेरिकेने नमूद केला.
२२ एप्रिलला पहलगामला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यात दहशतवादी तळांसह पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांना लक्ष्य केले होते. आता पाकिस्तानने भारतासमोर आव्हान उभे करण्यासाठी अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करण्यास सुरुवात केली.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या गोपनीय अहवालानुसार, पाकिस्तान त्याच्याकडील अण्वस्त्रांच्या साठ्याचे वेगाने आधुनिकीकरण करत आहे. तसेच पाकिस्तान हा भारताला आपल्या अस्तित्वासाठी मोठा धोका मानत आहे. ही रणनीती पाकिस्तानची लष्करी विचारसरणी आणि सीमेवरील त्यांच्या आक्रमकतेला दर्शवत आहे. या रिपोर्टमधील उल्लेखानुसार पाकिस्तान मुख्यत्वेकडून चीनकडून मिळणाऱ्या आर्थिक आणि लष्करी मदतीवर अवलंबून आहे. चीनकडून मिळणारी साधनसामुग्री आणि तांत्रिक मदतीच्या आधारावर पाकिस्तान आपल्या लष्करी सामर्थ्यासोबतच आण्विक ताकदीचाही विस्तार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, चीन आणि पाकिस्तानमधील ही आघाडी भारतासाठी सामरिकदृष्ट्या दुहेरी संकट निर्माण करत आहे. एकीकडे प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनकडून येत असलेला दबाव आणि दुसरीकडे पाकिस्तानचा आण्विक ताकद वाढवण्याचा आणि सीमेपलीकडून अस्थिरता निर्माण करण्याचा डाव भारताचा तणाव वाढवणारा आहे.