पाकने इतिहासातून अद्यापही धडा घेतला नाही - मोदी; कारगिल विजय दिवसाला २५ वर्षे पूर्ण

पाकिस्तानने इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही, त्यांनी जेव्हा दु:साहस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पराभवच पत्करावा लागला आहे.
पाकने इतिहासातून अद्यापही धडा घेतला नाही - मोदी; कारगिल विजय दिवसाला २५ वर्षे पूर्ण
Published on

नवी दिल्ली : पाकिस्तानने इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही, त्यांनी जेव्हा दु:साहस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पराभवच पत्करावा लागला आहे. दहशतवाद आणि छुप्या युद्धाचा त्यांनी सातत्याने वापर केला आणि अद्यापही करीतच आहेत, मात्र भारतीय जवान पूर्ण ताकद पणाला लावून दहशतवादी हल्ल्यांचे सर्व प्रयत्न चिरडून टाकतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कारगिल विजय दिवसाला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पाकिस्तानला दिला.

द्रासमधील कारगिल स्मृतिस्थळाजवळ झालेल्या एका समारंभात मोदी पुढे म्हणाले की, खोटेपणा आणि दहशतवादाला सत्याने १९९९च्या युद्धात गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे, तरीही पाकिस्तानने अद्यापही त्यामधून धडा घेतलेला नाही, आपण आज अशा ठिकाणावरून बोलत आहोत की जेथून दहशतवादाचे पुरस्कर्ते आपला आवाज थेट ऐकू शकतील. दहशतवादाच्या या आश्रयदात्यांना आपण सांगू इच्छितो की, त्यांचा हेतू कधीही साध्य होणार नाही, असेही मोदी म्हणाले.

दहशतवादाचा तीव्र निषेध करताना मोदी म्हणाले की, पाकिस्तानला भूतकाळात नेहमीच पराभव पत्करावा लागला आहे. दहशतवाद्यांचा दुष्ट हेतू कधीही साध्य होणार नाही. कारगिल युद्धात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली त्यांना मोदी यांनी आदरांजली वाहिली. कारगिलमध्ये आपण केवळ युद्धातच विजय मिळविला नाही तर आपण सत्य, संयम आणि सामर्थ्याचे अतुल्य दर्शन घडविले. देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते अमर असल्याचे कारगिल विजय दिवस आपल्याला सदैव स्मरण करून देत राहील, असेही पंतप्रधान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in