
भुज : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा ‘आयएमएफ’ने फेरविचार करावा, कारण या निधीचा वापर पाकिस्तान दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी करू शकतो, अशी भीती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय लष्कराने केलेल्या अतुलनीय कामगिरीचे कौतुक करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या विविध लष्करी तळांना भेटी देत आहेत. गुरुवारी जम्मू-काश्मीरचा दौरा केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी भुज येथील हवाई दलाच्या रूद्र माता तळाला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संपले नसल्याचे आणि हा फक्त ट्रेलर होता, असे सांगून पाकिस्तानला इशारा दिला.
शांततेसाठी भारत हा नेहमीच आग्रही राहिला आहे. भारत जगात नम्रतेसाठी ओळखला जातो. पण जर कुणी आमच्या शांततेला नख लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही जशास तसे उत्तर देतो, हेही जगाने आता पाहिले, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर भारताने कडाडून टीका केली. राजनाथ सिंह म्हणाले की, या कर्जाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या धरतीवरील दहशतवादाला खतपाणी घातले जाऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानला अर्थसहाय्य दिले जाऊ नये. ‘आयएमएफ’ने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी आमची मागणी आहे. मागच्या आठवड्यात ‘आयएमएफ’ने पाकिस्तानला १ अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. दोन अण्वस्त्रधारी देशांत लष्करी कारवाई सुरू असताना एवढी मोठी आर्थिक मदत दिली गेल्याने भारताने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती.
भारताच्या आक्षेपांना न जुमानता ‘आयएमएफ’ने एकूण सात अब्ज डॉलरच्या कर्जाच्या रकमेतील दुसऱ्या हप्त्याचे एक अब्ज डॉलर पाकिस्तानला देण्यास मंजुरी दिली आहे. सध्याच्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे कर्ज दिल्याचे ‘आयएमएफ’ने जाहीर केले आहे. तसेच भविष्यात १.४ अब्ज डॉलरचा आणखी एक कर्जाचा हप्ता पाकिस्तानला देणार असल्याचेही ‘आयएमएफ’ने जाहीर केले आहे.
...हा तर ट्रेलर, पिक्चर अद्याप बाकी आहे !
‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, हा फक्त ट्रेलर होता, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा जगाला आम्ही संपूर्ण चित्रपट दाखवू. तसेच पाकिस्तानला भारताने ‘प्रोबेशन पिरियड’वर ठेवले आहे. जर त्यांनी पुढील काळात आपली वर्तणूक सुधारली तर ठीक, नाहीतर त्यांना पुन्हा धडा शिकवला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी येथे दिला.