लखनऊ : देशात सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर व सचिन यांची प्रेमकथा चर्चेचा विषय बनली आहे. त्यातच सीमा हिच्यावर पाकिस्तानी हेर असल्याचा आरोप केला जात आहे. आता उत्तर प्रदेश एटीएसने सीमा हैदरला ताब्यात घेतले असून, गुप्त ठिकाणी तिची चौकशी सुरू केली आहे.
सीमा हैदर ही पहिल्यापासूनच एटीएसच्या रडारवर होती. ती नेपाळमार्गे आपला प्रियकर सचिन याला भेटायला भारतात आली. आता एटीएस व्हॉट्सॲॅप चॅट व अनेक पुराव्याच्या आधारावर तिची चौकशी करेल.
सीमाचे आयडी कार्ड हे उच्चायुक्त कार्यालयात पाठवले आहेत. तिचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार व तिचा भाऊ पाकिस्तानी सैनिक आहे. भारताच्या तपास यंत्रणा तिची चौकशी करणार आहेत. प्रेमप्रकरणापासून भारतात येईपर्यंतच्या सर्व घटनांची चौकशी केली जाईल.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीमा ही पाकिस्तानी नागरिक आहे. तिच्याबाबत अनेक रहस्य आहेत. त्यामुळे तिची चौकशी होणे साहजिक आहे. त्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणा तिची चौकशी करत आहे.
सीमा व सचिन मीणा हे २०१९ मध्ये पब्जी खेळताना एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर १३ मे २०२३ रोजी सीमा ही नेपाळ मार्गे बसमधून भारतात दाखल झाली. सीमा व सचिन हे ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा भागात राहतात. तेथे सचिन हा किराणामालाचे दुकान चालवतो. पोलिसांनी भारतात अवैधरीत्या घुसल्याप्रकरणी ४ जुलै रोजी तिला अटक केली होती. तसेच अवैध परदेशी नागरिकाला आसरा दिल्याप्रकरणी सचिनला तुरुंगात टाकले.