
लखनऊ : पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीणा यांच्या सध्या देशात चर्चेचा विषय ठरलेल्या प्रेमकहाणीत भारतीय सुरक्षा यंत्रणांची एन्ट्री झाल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. पाकिस्तानातून चार मुलांसह बेकायदेशीर भारतात आलेल्या सीमा हैदरला उत्तर प्रदेश एटीएसने सोमवारी ताब्यात घेत गुप्तस्थळी नेले आहे. तिच्यासोबत सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर संस्था 'आयबी'च्या इनपूटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची एजंट असल्याचा संशय आहे.
उत्तर प्रदेश एटीएसच्या नोएडा युनिटने सीमाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सीमा हैदरशिवाय सचिन मीना आणि त्याचे वडील नेत्रपाल यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांचीही वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी सुरू आहे. रबुपुरा येथे पोहोचलेल्या एटीएसच्या पथकाने या परिसराची नाकाबंदी करत सीमाला उचलले. एटीएस व्हॉट्सॲॅप चॅट व अनेक पुराव्यांच्या आधारावर तिची चौकशी करण्याची शक्यता आहे. सीमाचे आयडी कार्ड हे उच्चायुक्त कार्यालयात पाठवले आहेत. गेल्या काही दिवसांत गुप्तचर यंत्रणांनी सीमा हैदरबाबत बरीच माहिती गोळा केली आहे.
सीमा व सचिन मीणा हे २०१९ मध्ये पबजी खेळताना एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर १३ मे २०२३ रोजी सीमा ही नेपाळ मार्गे बसमधून भारतात दाखल झाली. सीमा व सचिन हे ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात राहतात. दोघांनीही लग्न केल्याचा दावा करण्यात येत आहे. सचिन किराणामालाचे दुकान चालवतो. पोलिसांनी भारतात अवैधरीत्या घुसखोरी केल्याप्रकरणी ४ जुलै रोजी सीमाला अटक केली होती. तसेच अवैध परदेशी नागरिकाला आसरा दिल्याप्रकरणी सचिनलाही तुरुंगात टाकले होते. नंतर त्याची जामिनावर सुटका केली होती. आता तिला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. सीमा खरोखरच 'लव्ह अॅडिक्ट' म्हणून भारतात आली आहे की, ती आयएसआयच्या कटाचा भाग आहे का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आयबीला याबाबत माहिती मिळाल्याचे वृत्त आहे.
काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात!
सीमा हैदर हिचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार व तिचा भाऊ पाकिस्तानी सैनिक आहे. त्यामुळे तिच्याविषयी संशय बळावला आहे. प्रेमप्रकरणापासून भारतात येईपर्यंतच्या सर्व घटनांची भारतीय तपास यंत्रणा चौकशी करणार आहेत. सीमाचे हावभाव आणि तिच्या सिद्धांतावर आधीच शंका उपस्थित करण्यात आली होती. सीमाच्या मते, तिचे फक्त पाचवीपर्यंतच शिक्षण झाले आहे. पण ती ज्या पद्धतीने इंग्रजी शब्द वापरते आणि स्मार्टफोन, कॉम्प्युटर हाताळणे तिला चांगले अवगत आहे. त्यामुळे तिच्यावरील संशय अधिकच बळावला आहे.