
चेन्नईत सोमवारी अण्णाद्रमुकच्या झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षातील दुफळी स्पष्टपणे दिसून आली. या बैठकीत पलानीस्वामी यांनाच पक्षाचे अंतरिम सरचिटणीस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पलानीस्वामींच्या (ईपीएस) नेतृत्वातील एका बैठकीत पनीरसेल्वम (ओपीएस) व त्यांच्या समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला.
पलानीस्वामी यांनी अण्णाद्रमुकच्या खजिनदारपदाची जबाबदारी डिंडुकल श्रीनिवासन यांना सोपवण्याची घोषणा केली आहे. “स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील द्रमुकच्या सरकारला एक वर्ष झाले आहे. त्यांनी राज्यासाठी काय केले? राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून, तरुणवर्गही चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. जनरल काउन्सिलच्या बैठकीपूर्वी आम्ही पक्ष मुख्यालयात सुरक्षेची मागणी केली होती; पण त्यानंतरही पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवली नाही. आज मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व ओपीएस यांनी संगनमताने अण्णाद्रमुक कार्यालय उद्ध्वस्त करण्याची योजना आखली. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो,” असेही पलानीस्वामी यांनी सांगितले.