६० फूट खोल खड्ड्यात JCB मशिनसह गाडला गेला राकेश; मृत्यूच्या १० महिन्यांनी का झाले अंत्यसंस्कार?

एका कुटुंबासाठी, त्यातही वृद्ध आई-वडिलांसाठी त्यांच्या तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी मिळणे म्हणजे आभाळ फाटल्यासारखेच असते. ही घटना पालघरमध्ये घडली होती आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया १६०० किलोमीटर दूर उत्तर प्रदेशच्या आजमगडमधील घरी नुकतीच पार पडली. मृतदेह न सापडल्यामुळे शरीराच्या आकाराचा पिठाचा पुतळा बनवून त्यावर राकेशचा फोटो...
६० फूट खोल खड्ड्यात JCB मशिनसह गाडला गेला राकेश; मृत्यूच्या १० महिन्यांनी का झाले अंत्यसंस्कार?
FPJ
Published on

एका कुटुंबासाठी, त्यातही वृद्ध आई-वडिलांसाठी त्यांच्या तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी मिळणे म्हणजे आभाळ फाटल्यासारखेच असते.

पालघरच्या नवघर परिसरात ही घटना घडली होती, ज्यामुळे ३५ वर्षीय राकेश यादवच्या मृत्यूच्या १० महिन्यांनंतर त्याच्या कुटुंबियांना पिठाच्या पुतळ्याचे अंत्यसंस्कार करावे लागले. २९ मे २०२४ रोजी मृत्यू झालेल्या राकेशचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही, त्यामुळे पंडितांच्या सांगण्यानुसार त्याच्या शरीराच्या आकाराचा पिठाचा पुतळा बनवून त्यावर राकेशचा फोटो लावण्यात आला आणि नंतर पारंपरिक रीतीरिवाजांनुसार अंतिम संस्कार करण्यात आले.

राकेश अंदाजे पाच फूट उंच होता, त्यामुळे त्याच उंचीचा आणि आकाराचा पिठाचा एक पुतळा तयार करण्यात आला. चेहऱ्याच्या जागी राकेशचा फोटो लावण्यात आला होता. त्याच फोटोला माळ घालण्यात आली. ३५ वर्षाच्या मुलाचे ६२ वर्षीय पित्याला अशाप्रकारे अंत्यसंस्कार करावे लागले. हे दृष्य बघणाऱ्यांचे अश्रू अनावर झाले होते. मात्र, अजूनही कुटुंबीय राकेशच्या मृतदेहाची आणि मृत्यू प्रमाणपत्राची वाट पाहत आहेत. चला जाणून घेऊया नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण.

ही घटना पालघरमध्ये घडली होती आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया १६०० किलोमीटर दूर उत्तर प्रदेशच्या आजमगडमधील घरी नुकतीच पार पडली. 'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, राकेशचे वडील म्हणाले की, जर पार्थिव शरीर मिळाले नाही, तर आम्ही राकेशच्या उंचीइतका पुतळा तयार करु शकतो असे पंडितजींनी सांगितले होते. त्यामुळे आम्ही पिठाचा पुतळा बनवला आणि त्याचेच अंत्यसंस्कार केले.

अपघातस्थळ
अपघातस्थळFPJ

२९ मे २०२४ रोजी राकेश आपल्या ८ टन वजनी खोदकाम मशीनसह मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (MMRDA) अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पासाठी बोगदा खोदत होते. वसईतील वर्सोवा पुलालगत असलेल्या सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी बोगद्याचे खोदकाम करत असताना अचानक माती खचली आणि मशिनसह राकेश ६० फूट खोल खड्ड्याच्या तळाशी कोसळले, वरुन काँक्रिटची भिंतही कोसळली आणि जेसीबीसह ते संपूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अपघातानंतर ४ महिन्यांनी प्रशासनाने शोध मोहिम देखील बंद केली, पण अधिकाऱ्यांनी अजूनही अधिकृतरीत्या राकेशला मृत घोषित केलेले नाही. आम्ही वसईमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, मृतदेह सापडला नसल्यामुळे मृत्यू प्रमाणपत्र जारी करता येणार नाही, असे कुटुंबातील एका सदस्याने सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यादव कुटुंबियांना ५० लाखांचा धनादेश दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in