चेन्नई : स्वादुपिंडाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी बायोमार्कर विकसित करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासने पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले आहे. त्यामुळे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.
स्वादुपिंडाचा कर्करोग हे जगभरातील कर्करोगाच्या मृत्यूचे चौथे प्रमुख कारण आहे आणि दशकभरात हे दुसरे कारण ठरेल, असा अंदाज आहे. कर्करोगाच्या घटनांचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांश फार्मास्युटिकल कंपन्या विशिष्ट उपचारांसाठी बायोमार्कर स्थापित करण्यासाठी भारतीय-विशिष्ट कर्करोग जिनोम डेटाच्या प्रतीक्षेत आहेत. आज भारतीय लोकसंख्येशी संबंधित कर्करोगाचा जिनोम डेटा उपलब्ध नसल्याने आणि सर्व अभ्यास पाश्चात्य लोकसंख्येच्या उपलब्धतेवर आधारित असल्याने रुग्ण जगण्याचा दर पाश्चात्य समाजांच्या तुलनेत खूपच कमी आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन कॅन्सर जिनोमिक्स अँड मॉलिक्युलर थेरप्युटिक्सकडील डेटा भारताचा कर्करोग जिनोम डेटाबेस विकसित करण्यात मदत करेल. त्यातून औषधांचा प्रतिसाद लवकर शोधण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी बायोमार्कर विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत मिळणार आहे.
संशोधनाविषयी माहिती देताना प्रकल्पाचे प्रमुख संशोधक एस. महालिंगम, जैवतंत्रज्ञान विभाग, आयआयटी-मद्रास यांनी सांगितले की, प्रस्तावित कामातून ओळखले जाणारे बायोमार्कर आणि प्रारंभिक निदान तंत्र विकसित केले जातील. असाच दृष्टिकोन भारतात प्रचलित असलेल्या इतर कर्करोगांसाठी विस्तारीत केला जाईल. यामुळे कर्करोग उपचार आणि निदानावर एक स्टार्टअप कंपनी सुरू करण्यास मदत होईल.
लवकर निदान, रोग निरीक्षण, उपचार प्रतिसाद आणि रोग निरीक्षणासाठी नॉन-इन्व्हेझिव्ह बायोमार्कर जनुक पॅनेल विकसित करण्याच्या दिशेने कार्य करणे आणि वैयक्तिक कर्करोग उपचारांसाठी रोग निरीक्षण आणि औषध तपासणीसाठी प्रीक्लीनिकल थ्री-डी ऑर्गनॉइड मॉडेल तयार करणे, हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे महालिंगम यांनी सांगितले.
देशातील पहिलाच प्रयोग
हा कर्करोग जीवशास्त्रज्ञ, जैव अभियंता, संगणकीय जीवशास्त्रज्ञ आणि क्लीनिकल तज्ज्ञ यांच्यातील एक अनोखा सहयोगी उपक्रम आहे आणि भारतातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आंतरविद्याशाखीय प्रयत्नांची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.