पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांची भुरळ पडणे हा आत्महत्येपेक्षा कमी प्रकार नाही; एनसीईआरटी संचालकांची खंत

अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असतानाही पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांची अद्यापही भुरळ पडत असल्याची खंत एनसीईआरटीचे संचालक डी. पी. सकलानी यांनी व्यक्त केली.
पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांची भुरळ
पडणे हा आत्महत्येपेक्षा कमी प्रकार नाही; एनसीईआरटी संचालकांची खंत

नवी दिल्ली : अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असतानाही पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांची अद्यापही भुरळ पडत असल्याची खंत एनसीईआरटीचे संचालक डी. पी. सकलानी यांनी व्यक्त केली. सरकारी शाळांमध्ये सध्या दर्जेदार शिक्षण दिले जात असतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे ओढा असणे हा प्रकार आत्महत्येहून कमी नाही, असेही सकलानी यांनी म्हटले आहे.

इंग्रजीमध्ये घोकंपट्टी करण्याच्या सवयीमुळे मुलांच्या ज्ञानाची हानी होते आणि हे प्रकार त्यांना त्यांच्या संस्कृतीपासून दूर नेतात, असेही सकलानी यांनी वृत्तसंस्थेच्या संपादकांशी संवाद साधताना स्पष्ट केले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पालकांना वेड आहे. प्रशिक्षित शिक्षक नसले तरीही ते आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच पाठवितात. हा आत्महत्येपेक्षा लहान प्रकार नाही आणि म्हणूनच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर भर देण्यात आला आहे, असेही सकलानी म्हणाले.

शिक्षण मातृभाषेवर आधारित का हवे, कारण जोपर्यंत आपल्याला मातृभाषा, आपले मूळ कळत नाही तोपर्यंत अन्य बाबी कशा कळणार, असा सवालही त्यांनी केला. आता आम्ही १२१ भाषांमधील पुस्तके विकसित करीत आहोत, ती लवकरच तयार होतील आणि त्यामुळे शाळेत जाणारी मुळे आपल्या मुळाशी जोडली जातील, असेही सकलानी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in