Video : 'चमत्कारी उपचारासाठी' कॅन्सरग्रस्त मुलाला पालकांनी वारंवार गंगेत बुडविले; चिमुकल्याने प्राण गमावले

"ब्लड कॅन्सरग्रस्त आपल्या मुलाने गंगास्नान (पवित्र गंगेत डुबकी मारली) तर तो आजार बरा होईल, असे अंधश्रद्धाळू पालकांना वाटत होते"
Video : 'चमत्कारी उपचारासाठी' कॅन्सरग्रस्त मुलाला पालकांनी वारंवार गंगेत बुडविले; चिमुकल्याने प्राण गमावले

हरिद्वारमध्ये अंधश्रद्धेने सात वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतला. ब्लड कॅन्सरने ग्रस्त मुलाच्या पालकांनी 'चमत्कारी' उपचाराच्या आशेने त्याला बळजबरी करीत वारंवार गंगा नदीत डुबकी मारण्यासाठी बुडविले, यात त्याचा मृत्यू झाला. हरिद्वारच्या 'हर की पौरी'मध्ये ही हृदयद्रावक घटना घडली.

माहितीनुसार, दिल्लीहून आलेले एक कुटुंब बुधवारी त्यांच्या 7 वर्षांच्या मुलासह 'हर की पौरी'च्या काठावर पोहोचले. मुलाच्या पालकांसोबत कुटुंबातील आणखी एक महिला सदस्य होती. त्यांनी मुलाला पवित्र नदीत डुबकी मारण्यासाठी नेले, परंतु या प्रक्रियेत मुलाचा मृत्यू झाला. "मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हात वर केल्यानंतर गंगास्नानाने मुलगा बरा होईल या आशेने ते आले होते", असे पोलिसांनी सांगितले. "ब्लड कॅन्सरग्रस्त आपल्या मुलाने गंगास्नान (पवित्र गंगेत डुबकी मारली) तर तो आजार बरा होईल, असे अंधश्रद्धाळू पालकांना वाटत होते", असे शहराचे पोलिस अधीक्षक स्वतंत्र कुमार यांनी सांगितले. "कुटुंबियांसोबत असलेल्या महिलेने (काकू किंवा मावशी) त्याला त्याच्या आई-वडिलांसमोर बुडवले. सुरुवातीला मूल किंचाळत होते, पण नंतर त्याचे मोठमोठ्याने रडणे थांबले. तेव्हा जवळच्या लोकांनी मुलाला रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले," असे कुमार म्हणाले.

या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला बराच वेळ मुलाला पाण्यात बुडवताना दिसतेय. मुलगा रडतो, ओरडतो. ते बघून आजूबाजूचे लोक तेथे पोहोचतात आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण, महिला त्यांना धक्काबुक्की करू लागते. बऱ्याच वेळानंतर मुलाला बळजबरी पाण्यातून बाहेर काढले जाते. त्यानंतर उपस्थित लोक पोलिसांना घटनेची माहिती देतात. पोलिस तात्काळ मुलाला रुग्णालयात नेतात, पण तिथे त्याला मृत घोषित केले जाते.

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई सुरू केली जाईल, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in