दुर्दैवी! शेजाऱ्यासोबत पार्किंगच्या भांडणात गेला IISER च्या शास्त्रज्ञाचा जीव, मोहालीमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

Mohali scientist death : शेजाऱ्यासोबत झालेल्या पार्किंगच्या वादातून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, IISER) कार्यरत एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा प्रमुख शहरांमधील पार्किंग वाद किती हिंसक होत आहेत याकडे लक्ष वेधले आहे.
दुर्दैवी! शेजाऱ्यासोबत पार्किंगच्या भांडणात गेला IISER च्या शास्त्रज्ञाचा जीव, मोहालीमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
Published on: 

शेजाऱ्यासोबत झालेल्या पार्किंगच्या वादातून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, IISER) कार्यरत एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंंजाबच्या मोहालीमधील सेक्टर ६७ मध्ये ही घटना घडली.

डॉ. अभिषेक स्वर्णकर असे मृत शास्त्रज्ञाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री डॉ. स्वर्णकर यांचा शेजारी राहणाऱ्या मॉंटीसोबत वाद झाला. यावेळी मॉंटीने त्यांना जमिनीवर ढकलून मारहाण केल्याचा आरोप आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ होते स्वर्णकर

झारखंडच्या धनबादचे रहिवासी असलेले डॉ. स्वर्णकर हे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ होते. त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले होते. त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये काम केले होते आणि अलीकडेच भारतात परत येऊन IISER मध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट म्हणून रुजू झाले होते. डॉ. स्वर्णकर यांनी अलीकडेच किडनी ट्रान्सप्लांट केले होते आणि त्यांची बहीण किडनी दाता होती. ते डायलिसिसवर होते. घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

CCTV फुटेजमध्ये घटना कैद

डॉ. स्वर्णकर सेक्टर ६७ मध्ये भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहत होते. CCTV फुटेजनुसार, माँटी आणि काही स्थानिक रहिवासी दुचाकीजवळ उभे होते. डॉ. स्वर्णकर दुचाकी काढण्यास आले असता वाद झाला. मॉंटीने त्यांना जोरात जमिनीवर ढकलून दिले आणि खाली पडल्यावर त्यांना मारहाण केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीय मध्यस्थी करुन माँटीला बाजूला हटवतात. तेव्हा डॉ. स्वर्णकार जमिनीवर पडलेले दिसतात. तोपर्यंत अन्य शेजारी देखील बाहेर येतात.

कुटुंबाची कठोर कारवाईची मागणी

डॉ. स्वर्णकर यांच्या कुटुंबीयांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी माँटीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी CCTV फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा प्रमुख शहरांमधील पार्किंग वाद किती हिंसक होत आहेत याकडे लक्ष वेधले आहे. याआधीही अनेकदा दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये पार्किंगवरून शेजाऱ्यांमध्ये होणाऱ्या भांडणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.