विरोधीपक्षांचे १४ खासदार निलंबित; संसदेच्या सुरक्षेवरुन सभागृहात घातला होता गोंधळ

या प्रकरणी पुढील कृती ठरवण्यासाठी उद्या सकाळी भारतातील विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांच्या बैठकीत याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं
विरोधीपक्षांचे १४ खासदार निलंबित; संसदेच्या सुरक्षेवरुन सभागृहात घातला होता गोंधळ

विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचे निलंबन केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याच्या प्रकरणावरुन लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कारवाईदरम्यान या खासदारांनी सभागृहात असभ्य वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी या खासदारांचे निलंबन करण्यात आल्याने त्यांना अधिवेशनाच्या यानंतरच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही.

निलंबीत केलेल्या १४ खासदारांमध्ये काँग्रेसच्या देखील पाच खासदारांचा समावेश आहे.यात टीएन प्रथापन, हीबी एडेन, एस जोथीमनी, राम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांचा समावेश आहे. लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी काल(१३ डिसेंबर) संसदेच्या सुरक्षेत झालेल्या गंभीर चुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला टार्गेट करत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, कालची घटना दुर्दैवी होती. पण यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. या घटनेचे राजकारण होता कामा नये. त्यानंतर राज्यसभेत देखील गोंधळ सुरु झाला झाला. यामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं.

यावर काँग्रेसचे खासदार मानिकम टागोर म्हणाले की, आमची मागणी केवळ एवढीच होती की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत घडलेल्या सुरक्षेत झालेल्या गंभीर चूकीवर उत्तर द्यावं. मात्र, याउटल प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचेच निलंबन करण्यात आले. यावरुन सरकारची मानसिकता दिसून येते. विरोधी पक्षांचे प्रश्न ऐकून त्यांचे उत्तर द्यायला सरकार तयार नाही. या सरकारची मानसिकता ही जर्मनीच्या हिटलरराज सारखी होत आहे. या प्रकरणी पुढील कृती ठरवण्यासाठी उद्या सकाळी भारतातील विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांच्या बैठकीत याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण?

लोकसभेत शुन्य प्रहरादरम्यान भाजप खासदार खरगेन मुर्मू बोलत असताना एका व्यक्तीने लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. यानंतर त्याच्या मागे लगेच दुसऱ्या वक्तीने देखील उडी मारली. यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. काही खासदारांनी मिळून या दोघांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केलं. या दोघांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या अँटी टेरर युनिटच्या स्पेशल सेलकडून या घुसखोरी करणाऱ्यांची चौकशी सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in