

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून बोलावण्याचा प्रस्ताव दिला आहे. या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालवण्यात येईल, असे सांगण्यात येते.
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी विशेष अधिवेशनाबद्दल माहिती दिली. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना अनुक्रमे ३० नोव्हेंबर (सोमवार) आणि २ डिसेंबर (बुधवार) रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची विनंती सरकारने केली आहे. या अधिवेशनात आवश्यक सरकारी कामकाज पार पाडले जाणार आहे. कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचे अधिवेशन ३ डिसेंबर २०२६ रोजी संपण्याची शक्यता आहे, असे रिजितू यांनी सांगितले.
हे विशेष अधिवेशन पावसाळी अधिवेशनाचा विस्तार असेल. संसदेचे कामकाज १३ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. मात्र, अधिवेशन अद्याप औपचारिकरीत्या समाप्त करण्यात आलेले नाही. विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दक्षिणात्य राज्यांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न
मतदारसंघ पुनर्रचनेबाबत दक्षिणेकडील राज्यांच्या चिंता दूर करण्यासाठी सरकार राज्यनिहाय लोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याच्या सूत्रावर विचार करत असल्याचे समजते. प्रस्तावित आराखड्यात १९७१ च्या जनगणनेनुसार राज्यांमधील जागांचे विद्यमान प्रमाण कायम ठेवण्याचाही विचार आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
विरोधकांच्या पाठिंब्याची गरज
लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव या घटनादुरुस्ती विधेयकात आहे. त्यातून संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी सध्याच्या ५४३ सदस्यांच्या सभागृहात ३६१ मतांची गरज आहे. तीन जागा रिक्त असल्याने लोकसभेची सदस्यसंख्या ५४० आहे. सत्ताधारी एनडीएकडे ३२० सदस्य आहेत. विधेयक मंजुरीसाठी विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे.
बदललेली राजकीय समीकरणे
एप्रिलमध्ये विधेयक फेटाळले गेल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. विरोधी गटातील २६ खासदार सत्ताधारी आघाडीकडे आले आहेत. तृणमूल काँग्रेसचे २० बंडखोर नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन झाले असून, त्यांनी एनडीएला पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. सरकारची स्थिती मजबूत झाली असली, तरी विधेयक मंजुरसाठी आणखी काही खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. द्रमुकचे २२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आठ खासदार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.