सरकारी बसमध्ये प्रवासी 'झुंजीचा कोंबडा' विसरला, अधिकाऱ्यांनी लिलाव जाहिर केला; पण तितक्यात...

संक्रांतीच्या झुंजीसाठी आणलेला कोंबडा एक प्रवासी बसमध्ये विसरून गेला होता...
सरकारी बसमध्ये प्रवासी 'झुंजीचा कोंबडा' विसरला, अधिकाऱ्यांनी लिलाव जाहिर केला; पण तितक्यात...

तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (TSRTC) च्या अधिकाऱ्यांना आपल्या बसमध्ये सापडलेल्या झुंजीच्या कोंबड्यासाठी आयोजित केलेली लिलाव प्रक्रिया अचानक थांबवावी लागली आहे.

९ जानेवारी रोजी वारंगलहून वेमुलवाडा येथे जाणाऱ्या बसमध्ये एक प्रवासी पिंजऱ्यात बंद कोंबडा विसरून गेला होता. बस करीमनगर येथे आल्यावर टीएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांनी हा कोंबडा ताब्यात घेतला. २४ तास वाट बघूनही कोंबड्याचा कोणीच मालक समोर न आल्यामुळे अखेर अधिकाऱ्यांनी या कोंबड्याचा शुक्रवारी दुपारी ३ वाजता लिलाव करणार असल्याचे जाहिर केले होते. इच्छुकांनी लिलावात सहभागी व्हावे आणि जमा होणारे पैसे राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केले जातील, असे आवाहनही करण्यात आले होते.

आरटीसीच्या नियमांनुसार, २४ तासांमध्ये कोणीही विसरलेल्या वस्तूंवर दावा न केल्यास, लिलाव करावा लागतो, असे करीमनगर डेपो-2 चे व्यवस्थापक म्हणाले.

पण, ही लिलाव प्रकिया सुरू होण्याआधीच महेश नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जारी केलेला सेल्फी व्हिडिओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. करीमनगर ते नेल्लोर बसप्रवास करताना संक्रांतीच्या झुंजींसाठी आणलेला कोंबडा विसरलो होतो असा दावा महेशने व्हायरल व्हिडिओत केला. व्हिडिओ बघून लगेच अधिकाऱ्यांनी लिलाव प्रक्रिया रद्द केली आहे. मात्र कोंबडा पशु कल्याण केंद्राकडे सुपूर्द केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोंबड्याच्या या अनोख्या लिलावाची बातमी सध्या चर्चेत आहे.

logo
marathi.freepressjournal.in