पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी स्विकारण्यास बंदी

भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला प्रीपेड सुविधा, वॉलेट्स, आणि फास्टॅगसह कोणत्याही प्रकारे ग्राहकांच्या खात्यात ठेवी स्विकारण्यावर बंदी घातली आहे.
पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी स्विकारण्यास बंदी

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला प्रीपेड सुविधा, वॉलेट्स, आणि फास्टॅगसह कोणत्याही प्रकारे ग्राहकांच्या खात्यात ठेवी स्विकारण्यावर बंदी घातली आहे. आरबीआयची ही बंदी २९ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे. त्रयस्थ ऑडिटर्सकडून अनुपालन वैधता आणि व्यापक सिस्टीम ऑडीट बाबत मिळालेल्या अहवालाच्या आधारे आरबीआयने ही बंदी घातली आहे. त्रयस्थ ऑडीटर्सच्या अहवालातून उघडकीस आलेल्या बाबींनुसार पेटीएम पेमेंट बँकेने सातत्याने नियमांचे अनुपालन टाळले आहे. यामुळे बँकेवर पुढील कारवाई होऊ शकते.

आरबीआयच्या बंदीनुसार पेटीएम पेमेंट बॅंकेच्या कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड सुविधेत, वॉलेट्स, फास्टटॅग, एनसीएमसी काडे इत्यादि खात्यात यापुढे पैसे क्रेडीट करता येणार नाहीत. ग्राहकांच्या खात्यात आधीच जर काही रक्कम शिल्लक असेल तर त्या ग्राहकाने ती रक्कम वापरण्यास अथवा काढून घेण्यावर मात्र आरबीआयकडून कोणत्याही प्रकारचे बंधन घालण्यात आलेले नाही. मार्च २०२२ मध्ये आरबीआयने पेटीएम पेमेंट बॅंक लिमिटेडला नवे ग्राहक जोडण्यास मनार्इ केली होती.

logo
marathi.freepressjournal.in