

पेशावर येथील निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर सोमवारी सकाळी आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान ठार आणि किमान पाच जण जखमी झाले आहेत. यावेळी पाक लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ३ हल्लेखोर ठार झाले.
निमलष्करी दलाच्या मुख्यालयाजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास सदर-कोहाट रस्त्यावर हा हल्ला झाला. मुख्यालयाच्या गेटवर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. त्यानंतर अन्य हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबारही केला. पेशावरमध्ये स्फोटांचे अनेक आवाज ऐकू आले आणि त्यानंतर परिसर रिकामा करण्यात आला.
पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात सहभागी असलेले आत्मघातकी हल्लेखोर ठार झाले आहेत. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी ठार झाले आणि इतर दोघे जखमी झाले. दुसऱ्या हल्लेखोराने मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तथापि, सुरक्षा दलांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि बचाव कार्य सुरू केले.
शांतता कराराचा भंग
दरम्यान, पेशावरमधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या लेडी रीडिंग रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सहा जखमींना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांच्यातील शांतता कराराचा भंग झाला. यानंतर खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत.