तीन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर; १०० डॉलर प्रति बॅरल दर

क्रूड तेलातील घसरणीचा लाभ देशातील नागरिकांना कधी मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
तीन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर; १०० डॉलर प्रति बॅरल दर

देशातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे भारतातील पेट्रोलियम पदार्थांच्या म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही स्थिर आहेत. गेल्या तीन महिन्यांत त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या काळात महाराष्ट्र वगळता कोणत्याही राज्यात पेट्रोलच्या दरात बदल झालेला नाही. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते १०० डॉलर प्रति बॅरलच्या आत आहे. त्यामुळे क्रूड तेलातील घसरणीचा लाभ देशातील नागरिकांना कधी मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

मे महिन्यात केंद्र सरकारने तेलाच्या किमतीत उत्पादन शुल्क कमी करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत जनतेला मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्रातील नवीन एकनाथ शिंदे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट रद्द करून त्यांच्या किमतीत कपात केली.

भारतातील पेट्रोलियम तेल विपणन कंपनी इंडियन ऑइलच्या नवीनतम दरांनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २२ ऑगस्ट रोजी एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आहे, तर एक लिटर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली राहिल्यास देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महानगरातील इंधनदर

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये आहे. तर कोलकातामध्ये १०६.०३ रु. लिटर तर डिझेल ९४.२४ रु. लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रु. तर डिझेल ९४.२४ रु. प्रति लिटर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in