‘पीएफआय’कडून मोदींच्या हत्येचा कट रचला होता; ईडीचा खळबळजनक दावा

देशातील विविध राज्यांत ९३ ठिकाणांवर छापेमारी करत १०० हून अधिक जणांना अटक केली होती
‘पीएफआय’कडून मोदींच्या हत्येचा कट रचला होता; ईडीचा खळबळजनक दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ जुलैला पाटण्यातील सभेत हत्या करण्याचा कट ‘पीएफआय’ने रचला होता, असा खळबळजनक दावा ‘ईडी’ने केला आहे. एनआयए-ईडीने ‘ऑपरेशन ऑक्टोपस’अंतर्गत गुरुवारी देशातील विविध राज्यांत ९३ ठिकाणांवर छापेमारी करत १०० हून अधिक जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत हा धक्कादायक खुलासा झाला आहे.केरळातील कोझिकोडेहून अटक करण्यात आलेला ‘पीएफआय’ कार्यकर्ता शफीक पायथेचाही या कटात सहभाग होता. केरळमध्ये हा कट रचला गेला, अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटमध्ये दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्यासाठी ‘पीएफआय’ संघटनेने एक प्रशिक्षण शिबीरही आयोजित केले होते, ज्या माध्यमातून २०१३ सारखी घटना घडवून आणण्याचा उद्देश होता. ऑक्टोबर २०१३मध्ये पाटण्याच्या गांधी मैदानात नरेंद्र मोदी यांच्या सभेत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याचा संदर्भ रिमांड नोटमध्ये देण्यात आला आहे. हवालाच्या माध्यमातून पैसे गोळा करून ‘पीएफआय’चे सदस्य ट्रेनिंग कॅम्प चालवतात. यासोबतच हे सदस्य देशभरातील अनेक गुन्हेगारी कृत्यांत सहभागी झाले आहेत. एप्रिलपासूनच त्यांची चौकशी सुरू होती. ‘सीएए’ कायदा आणि हाथरससारख्या घटनांमध्येही सरकारविरुद्ध लोकांना भडकावण्यात या संघटनांचा सहभाग होता, अशी माहिती तपास यंत्रणांनी न्यायालयात दिली.

भारताला मुस्लीम राष्ट्र बनवणे हे ‘पीएफआय’चे मुख्य उद्दिष्ट्य आहे. या संघटनेला आखाती देशातून मोठ्या प्रमाणावर फंडिंग होते. सर्व पैसे हवालाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतात. या वर्षी पीएफआयचे सुमारे १२० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पायथे यानेही ४० लाख रुपये कतारहून ट्रान्स्फर केले होते, अशी माहिती ‘ईडी’ने दिली. इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी ‘पीएफआय’ने तरुणांना ‘लष्कर’ आणि ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. मोदींच्या सभेदरम्यान पाटणा पोलिसांनी फुलवारी शरीफहून तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. हे सर्व पंतप्रधानांच्या सभेत हल्ल्याचा कट आखत होते. या दहशतवाद्यांकडून सात पानांचा एक दस्तावेज हस्तगत करण्यात आला होता, ज्याच्या मुखपृष्ठावर २०४७ लिहिले होते. दहशतवाद्यांनी २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची मोहीम आखली होती, असे कोचीत ‘एनआयए’कडून दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in