कर्नाटकमध्ये पीएफआयच्या दहशतवाद्याला अटक

पीएफआय ही संघटना देशात इस्लामी राजवट आणण्याच्या हेतूने दहशतवादी कारवाया करत होती
कर्नाटकमध्ये पीएफआयच्या दहशतवाद्याला अटक

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी असलेल्या संघटनेचा दहशतवादी आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षक नोस्सम मोहम्मद युनूस याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी कर्नाटकमधून अटक केली. निझामाबाद येथील दहशतवादी कटात सामील असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

युनूस (वय ३३) हा आंध्र प्रदेशातील नंद्याल येथील मूळ रहिवासी असून, तेथे तो त्याच्या थोरल्या भावाच्या इन्व्हर्टरच्या व्यवसायात काम करत होता. त्यासह तो दहशतवादी कारवायांत सामील असल्याचा संशय होता. सप्टेंबर २०२२ मध्ये सुरक्षा संस्थांनी त्याच्या घरावर धाड टाकली तेव्हा तो त्याच्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह फरार झाला होता. त्यानंतर तो सर्व कुटुंबासह कर्नाटकच्या बेळ्ळारी जिल्ह्यातील कौल बझार येथे स्थायिक झाला होता. तेथे त्याने बशीर असे नवे नाव धारण केले आणि प्लंबरचा व्यवसाय सुरू केला होता.

पीएफआय ही संघटना देशात इस्लामी राजवट आणण्याच्या हेतूने दहशतवादी कारवाया करत होती. ती तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांत तरुणांना भरती करून कट्टर इस्लामची शिकवण तसेच शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देत होती. युनूस हा त्यांचा शस्त्रास्त्र प्रशिक्षक होता. या संघटनेवर सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये बंदी घातली होती.

logo
marathi.freepressjournal.in