पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान; महाराष्ट्रात ५६.५४ टक्के मतदारांनी बजावला हक्क; 'या' राज्यात झाले सर्वाधिक मतदान

देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांत शुक्रवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले.
पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान; महाराष्ट्रात ५६.५४ टक्के मतदारांनी बजावला हक्क; 'या' राज्यात झाले सर्वाधिक मतदान

नवी दिल्ली : देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांत शुक्रवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. देशभरात लोकसभेसाठी सरासरी ६०.०३ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या पाच मतदारसंघांत ५६.५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. देशभरातील १६०० हून अधिक उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रांत बंद झाले. दरम्यान, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभेच्या ९२ जागांसाठीही मतदान झाले. तेथे ६५ टक्के मतदान झाले. लोकसभा मतदानादरम्यान मणिपूर आणि पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. छत्तीसगडमध्ये बाॅम्बचा चुकून स्फोट झाल्याने सीआरपीएफच्या एका जवानाचा मृत्यू झाला.

अठराव्या लोकसभेसाठी शुक्रवारी पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये मतदान झाले. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, किरेन रिजिजू, जितेंद्र सिंग, अर्जुन राम मेघवाल आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यासह काँग्रेसचे गौरव गोगोई, द्रमुकच्या कणिमोळी आणि भाजपचे तामिळनाडूचे प्रमुख के. अन्नामलाई यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले. मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ६ वाजता संपले. काही ठिकाणी मतदान बंद होण्याची वेळ वेगवेगळी होती. त्यात जवळपास २ लाख मतदान केंद्रांवर १६.६३ कोटी मतदार सहभागी होणे अपेक्षित होते. त्यापैकी सरासरी ६०.०३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी एकूण ४१ हेलिकॉप्टर, ८४ विशेष गाड्या आणि जवळपास एक लाख वाहने तैनात करण्यात आली होती. त्यासह मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस, निमलष्करी दले, निरीक्षक असा फौजफाटा तैनात केला होता. काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षकही तैनात करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणी ४ जून रोजी होईल.

मणिपूर, प. बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट

मणिपूर आणि पश्चिम बंगाल या राज्यांत शुक्रवारी मतदानाला किरकोळ हिंसाचाराचे गालबोट लागले. मणिपूरमध्ये काही ठिकाणी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. तसेच शस्त्रांच्या बळावर दहशत निर्माण करून निवडणूक अधिकारी आणि मतदारांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त मतदारांनी ४ मतदान यंत्रांची तोडफोड केली. त्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. पश्चिम बंगालमध्येही गावठी बॉम्बचा स्फोट, दोन गटांत हाणामारी आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.

नागालँडच्या सहा जिल्ह्यांमध्ये बहिष्कार

नागालँडमधून स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्या ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने (ईएनपीओ) या प्रदेशातील सहा जिल्ह्यांतील लोकांना लोकसभा निवडणुकीत मतदानापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. नागालँडमध्ये लोकसभेच्या एकमेव जागेसाठी शुक्रवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. तथापि, या सहा जिल्ह्यांमध्ये मतदान झाले नाही. सहा जिल्ह्यांमध्ये ४ लाख मतदार आहेत. ते ‘ईएनपीओ’ला पाठिंबा देण्यासाठी मतदानाच्या दिवशी घरातच राहिले. दुपारी एक वाजेपर्यंत सहा जिल्ह्यांत एकाही मतदाराने मतदान केले नव्हते.

त्रिपुरात सर्वाधिक, बिहारमध्ये सर्वात कमी मतदान

देशात सर्वाधिक मतदान त्रिपुरामध्ये ७९.९० टक्के झाले. त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये ७७.५७ टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी मतदान बिहारमध्ये ४८.२३ टक्के झाले. दहशतवादातून सावरत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये ६५.०८ टक्के मतदान झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in