दिंडोरी : मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील बडझर घाटाजवळ गुरुवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एक पिकअप व्हॅन सुमारे ४०-५० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १४ जण जागीच ठार झाले, तर २० जण जखमी झाले.
घाटानजीक एका कठीण वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही पिकअप व्हॅन उलटून दरीत कोसळली. मृतांमध्ये सात पुरुष, सहा महिलांचा व एका लहान मुलाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपविभागीय अधिकारी मुकेश अविंद्र यांनी सांगितले की, अपघातग्रस्त पिकअप व्हॅनमधील प्रवासी एका कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील शाहपुरा ब्लॉकमधील मसुरघुगरी गावातून अम्हा देवरी येथे परत येत होते.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.
अपघाताची माहिती मिळताच दिंडोरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा आणि पोलीस अधीक्षक अखिल पटेल यांनी पीडितांच्या मदतीसाठी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी शहापुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यापैकी दोघांना उपचारासाठी जबलपूरला पाठवण्यात आले आहे.