गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

पाच वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वी रेणूचा हात मोडला होता आणि ३० नोव्हेंबर रोजी हाताचे प्लास्टर काढण्यात आले होते, त्यामुळे पती हरजिंदर हेच रेणूची सर्व काळजी घेत होते. घटना घडली त्यावेळी हरजिंदर रेणूला आंघोळ घालण्य़ासाठी बाथरूममध्ये गेले होते असा अंदाज आहे.
गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय
गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय
Published on

उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात सोमवारी एक हृदयद्रावक घटना घडली. भाड्याच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीचे मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाथरूममध्ये बसवलेल्या गीजरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, या प्रकरणातील इतर पैलूंचाही तपास केला जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

काय घडलं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत डीआरडीए विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले हरजिंदर सिंह (४२) आणि त्यांची पत्नी रेणू सक्सेना (४०) यांचा मृत्यू झाला आहे. हे दाम्पत्य गुरुकुल पुरम कॉलनीत राहत होते. पाच वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वी रेणूचा हात मोडला होता आणि ३० नोव्हेंबर रोजी हाताचे प्लास्टर काढण्यात आले होते, त्यामुळे पती हरजिंदर हेच रेणूची सर्व काळजी घेत होते, असे समजते. घटना घडली त्यावेळी, रविवारी संध्याकाळी, हरजिंदर रेणूला आंघोळ घालण्य़ासाठी बाथरूममध्ये गेले होते असा अंदाज आहे. याच दरम्यान गॅस गीजरमधून विषारी गॅसची गळती होऊन दोघांचा श्वास कोंडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही रिपोर्ट्समध्ये, बाथरूममध्ये हवा खेळती नव्हती आणि गीझरमधून सतत निघणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड गॅसमुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याचेही नमूद आहे.

शेजाऱ्यांनी दिली पोलिसांना माहिती

रात्री घराच्या छतावर वाळत घातलेले कपडे तसेच असल्याचे शेजारील एका महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिने रेणू यांना फोन केला पण, फोन उचलला नाही म्हणून त्यांनी हरजिंदर यांना फोन केला, पण त्यांनीही प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांना संशय आला म्हणून त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

दरवाजा तोडून पोलिसांचा प्रवेश

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले एएसपी विक्रम दहिया यांनी माध्यमांना सांगितले की, बाथरूममध्ये एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची सूचना मिळाली होती. पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. तो तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळाच्या प्राथमिक तपासणीत गिझरमधून गॅस गळती झाल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. "प्रथमदर्शनी मृत्यूचे कारण गीजरमधील गॅस गळती असल्याचे वाटत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे." असे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in