
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये निरागस पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. सीमारेषेवर दोन्ही बाजूंनी लष्करी हालचाली सुरू असून, परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (दि.३० एप्रिल) सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची (CCS) महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बोलावलेली सीसीएसची ही दुसरी बैठक आहे.
बैठकीत शहा, राजनाथ राहणार उपस्थित
उद्या सकाळी ११ वाजता सीसीएसची ही महत्त्वाची बैठक होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सीसीएसचे इतर सदस्य आहेत. ते या बैठकीला उपस्थित राहतील, असे समजते. या बैठकीत पहलगाम हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षा तयारीचा आढावा घेतला जाईल. अलिकडच्या काळात झालेले हल्ले, नियंत्रण रेषेवरील परिस्थिती, सुरक्षा दलांची रणनीती आणि प्रत्युत्तर रणनीती यावर या बैठकीत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीसीएस बैठकीनंतर आर्थिक बाबींवरील कॅबिनेट समितीची बैठकीचेही नियोजन असल्याचे वृत्त आहे.
दुसऱ्या बैठकीत काय निर्णय होणार?
२३ एप्रिल रोजी झालेल्या सीसीएसच्या पहिल्या बैठकीत भारताने पाकिस्तानबाबत अनेक कठोर निर्णय घेतले होते. त्यात पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा तातडीने रद्द, सिंधू पाणी कराराला स्थगिती, अटारी सीमा बंद करणे असे काही महत्त्वाचे निर्णय होते. त्यावर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काही निर्बंध घातले आणि सिंधू पाणी कराराला स्थगिती देणे म्हणजे "युद्धाची कृती" असल्याचे संबोधले. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सीमेवर सलग पाचव्या रात्री गोळीबार; भारताचे जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने सलग पाचव्या रात्री जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. अखनूर सेक्टरजवळ झालेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले, अशी माहिती मंगळवारी एका अधिकाऱ्याने दिली आहे.