
मंगलदोई (आसाम) : काँग्रेस पक्ष देशाच्या सैन्याला पाठिंबा देण्याऐवजी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.
आसामच्या दररंग जिल्ह्यातील मंगलदोई येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, काँग्रेस घुसखोर आणि राष्ट्रविरोधी शक्तींचे ‘संरक्षण’ करत आहे. भाजप घुसखोरांना जमीन बळकावू देणार नाही आणि लोकसंख्येचा समतोल बदलण्याच्या कटाला आळा घालेल. काँग्रेस भारतीय सैन्याला पाठीशी घालण्याऐवजी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांना पाठिंबा देते. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आमच्या सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तेव्हा सैन्याला पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस घुसखोर व राष्ट्रविरोधी शक्तींचे संरक्षण करण्यात गुंतलेली होती, असा आरोप पंतप्रधानांनी जाहीरसभेत केला.
'ऑपरेशन सिंदूर' हे देवी कामाख्येच्या आशीर्वादामुळे यशस्वी झाले. या पवित्र भूमीत उपस्थित राहण्याचा सन्मान लाभल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी दावा केला की, "१९६२ मध्ये झालेल्या चिनी आक्रमणावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आसामच्या जनतेवर केलेल्या जखमा आजही भरून आलेल्या नाहीत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घुसखोरांना अतिक्रमित जमिनीतून बेदखल करून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जागा दिली.
भाजप घुसखोरांना जमीन बळकावू देणार नाही, महिलांचा व मुलींचा अपमान होऊ देणार नाही आणि लोकसंख्या बदलण्याचा कट यशस्वी होऊ देणार नाही, कारण हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. कॉंग्रेसने दशकानुदशके आसामवर राज्य केले, पण ब्रह्मपुत्रा नदीवर फक्त ‘तीन पूल’ बांधले, तर गेल्या १० वर्षांत भाजप सरकारने सहा पूल बांधले आहेत, असे ते म्हणाले.
मोदी यांनी सांगितले की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि आसामचा विकासदर १३ टक्के आहे. हे दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले. केंद्र व राज्य सरकार मिळून आसामला आरोग्य केंद्र म्हणून विकसित करत आहेत. 'विकसित भारत' या स्वप्नासाठी ईशान्य भारताची मोठी भूमिका आहे.
मोदी यांनी मंगलदोई येथे ६,३०० कोटी रुपयांच्या आरोग्य आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली. दारंग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, तसेच नर्सिंग कॉलेज आणि जीएनएम शाळेच्या बांधकामाचेही त्यांनी भूमिपूजन केले. या प्रकल्पांमध्ये एकूण ५७० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी २.९ किमी लांबीच्या नरेगी-कुरुवा पुलाची पायाभरणी केली, ज्याचा अंदाजित खर्च १,२०० कोटी रुपये आहे. तसेच ११८.५ किमी लांबीच्या गुवाहाटी रिंग रोड प्रकल्पाचीही पायाभरणी करण्यात आली, जो आसाममधील कामरूप आणि दारंग जिल्ह्यांना आणि मेघालयातील री भोई जिल्ह्याला जोडेल.
बांबूपासून इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात नुमालीगढ येथे ५ हजार कोटी रुपयांचा बांबूपासून इथेनॉल निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. हा प्रकल्प 'झिरो वेस्ट' संकल्पनेवर आधारित असून, बांबूच्या प्रत्येक भागाचा उपयोग केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकल्प ईशान्येतील चार राज्यांमधून दरवर्षी ५ लाख टन हिरवा बांबू खरेदी करेल. ज्याचा थेट व अप्रत्यक्ष लाभ ५०,००० हून अधिक लोकांना होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.