सोमनाथ (गुजरात) : स्वातंत्र्यानंतर गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ज्यांनी विरोध केला त्या शक्ती आजही सक्रिय आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी देशाने सतर्क, एकसंध आणि शक्तिशाली राहणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
इ.स. १०२६ मध्ये महमूद गजनवीने सोमनाथ मंदिरावर केलेल्या आक्रमणाला १ हजार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथे आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सोमनाथ मंदिरात अर्धा तास पूजा केली. शिवलिंगावर अभिषेक करून फुले अर्पण केली.
गुजरातच्या सोमनाथ मंदिरावर १ हजार वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यावेळी हल्लेखोरांना वाटले की आपण जिंकलो. पण, सोमनाथ मंदिरावरील फडकणारा ध्वज दाखवून देतो की, हिंदुस्थानची शक्ती काय आहे? दुर्दैवाने आजही सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला विरोध करणाऱ्या शक्ती कार्यरत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी मंदिरापासून जवळ असलेल्या ‘सद्भावना मैदाना’तील रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, आमच्यात फूट पाडणाऱ्या शक्तींपासून लांब राहणे गरजेचे आहे. सोमनाथचा इतिहास हा विनाश आणि पराभवाचा नसून विजय आणि पुनर्निर्मितीचा आहे. काळाच्या ओघात कट्टरतावादी आक्रमक इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित झाले आहेत; मात्र सोमनाथ मंदिर आजही अभिमानाने उभे आहे, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, शतकानुशतके वारंवार विनाशाचे प्रयत्न होऊनही सोमनाथ मंदिर टिकून आहे. त्याच्या प्राचीन वैभवाच्या पुनर्स्थापनेसाठी झालेल्या सामूहिक संकल्पना आणि प्रयत्नांमुळे ते धैर्य, श्रद्धा आणि राष्ट्रीय अभिमानाचे शक्तिशाली प्रतीक ठरले आहे, असे मोदी म्हणाले.
द्वेष, अत्याचार आणि दहशतीचा खरा इतिहास आमच्यापासून लपवला आणि हल्ला हा केवळ मंदिर लुटण्यासाठी केला गेला होता, असे आम्हाला शिकवण्यात आले, असे मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्या मार्गात अडथळे आणले गेले, असेही त्यांनी सांगितले.
तुष्टीकरणात गुंतलेल्यांनी कट्टर मानसिकतेच्या लोकांसमोर गुडघे टेकले. सोमनाथची कहाणी म्हणजे भारताची कहाणी आहे. या १ हजार वर्षांच्या संघर्षाला जगाच्या इतिहासात तोड नाही, असेही त्यांनी नमूद केले.