"मोदी-शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं..." उद्धव ठाकरेंचा थेट भाजप नेतृत्वावर हल्लाबोल

छत्रपतींच्या भगव्यावर कोणतंही चिन्ह नव्हतं, पण त्यांनी भगव्यामध्ये भेद केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"मोदी-शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं..." उद्धव ठाकरेंचा थेट भाजप नेतृत्वावर हल्लाबोल

मुंबई: शिवसेना ठाकरे गटानं आज पक्षाचा ५८ वा वर्धापनदिन साजरा केला. षण्मुखानंद सभागृहात यानिमित्तानं मोठा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षानं सर्व नवनिर्वाचित खासदारांचा त्याचबरोबर पराभूत आमदारांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विविध विषयांना स्पर्श केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर हिंदुत्वावरून टीका केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली

नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं...

उद्धव ठाकरे म्हणाले की, "आमच्यावर आरोप केला जातो. शिवसेनेला मराठी मतं पडली नाहीत. हिंदू मतं पडली नाहीत. मुस्लिम मतं पडली. हो पडलीत. सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला पडली आहेत. त्यात मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध सारेच आले. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, का तर आम्ही काँग्रेससोबत गेलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आहे. तुम्ही २०१४, २०१९ चा एनडीएचा फोटो पाहा आणि २०२४ चा पाहा. आज त्यांच्यासोबत जे चंद्राबाबू आणि नितीश कुमार बसलेत, ते हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात मुस्लिम समाजाला आश्वासनं दिलीच आहेत. आमच्याकडे चोरीमारी नाहीये. मुस्लिम समाजाला माहितीये, आम्ही वार केले तर समोरून करू, यांच्यासारखे पाठीमागून नाही."

तुम्ही भगव्यामध्ये भेद केला...

ठाकरे पुढे म्हणाले की, "मी नम्र आहे. तुम्ही प्रेमानं वागा, आम्हीही प्रेमानं वागू. पण तुम्ही पाठीत वार कराल, तर आम्ही वाघनखं काढू. आता मुनगंटीवार ज्यांची नखं उपटलीत चंद्रपूरमध्ये, ते लंडनध्ये पुन्हा वाघनखं आणायला चाललेत. अहो कशाला तुम्ही त्या छत्रपतींचा अपमान करताय. एकतर तुमची पात्रता नाही. गद्दार मानसिकतेचे तुम्ही. भगव्याशी गद्दारी करणारे तुम्ही. भगव्याशी बेईमानी करणारी औलाद तुमची. छत्रपतींच्या भगव्यावर कोणतंही चिन्ह नव्हतं, पण तुम्ही भगव्यामध्ये भेद केला. याचं चिन्ह छापा, त्याचं चिन्ह छापा. म्हणून आपल्या भगव्या झेंड्यावर आपलं चिन्ह टाकायचं नाही. आपला भगवा शिवरायांचा पवित्र भगवा आहे. तो भगवाच असला पाहिजे. मशालीचा प्रचार वेगळा करा. छत्रपतींच्या भगव्याला त्यांनी जो कलंक लावलाय, त्याला आपल्याला गाढायचंय. म्हणून भगव्यावर कोणतंही चिन्ह टाकू नका."

logo
marathi.freepressjournal.in