जयपूर : सक्रिय धोरणे, इंधनाच्या स्रोतांचे विविधीकरण आणि मजबूत राजनैतिक संबंधांमुळे भारताने जागतिक स्तरावरील एका सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाचा यशस्वी मुकाबला केला. या संपूर्ण संकटाचा देशातील नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू दिला नाही हे विशेष, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
बालोत्रा जिल्ह्यातील पचपद्रा येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रिफायनरीचे (तेल शुद्धीकरण कारखाना) उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान एका जाहीर सभेत बोलत होते.
इराण युद्धाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, भारताने या कठीण काळात आपल्या ऊर्जा आयातीचा लक्षणीय विस्तार केला. संकट सुरू झाले तेव्हा भारत केवळ २५ ते २६ देशांमधून इंधनाची आयात करत होता. मात्र, संकट काळात आपण ही संख्या ४० हून अधिक देशांपर्यंत वाढवली, असे सांगत त्यांनी या यशाचे श्रेय भारताच्या यशस्वी मुत्सद्देगिरीला दिले.
नुकसान सरकारने सोसले
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्यामुळे एप्रिल ते जून या कालावधीत तेल कंपन्यांचे ७५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले होते, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. मात्र, सरकारने हा भार नागरिकांवर पडू दिला नाही.
आम्ही अबकारी करात प्रति लिटर १० रुपयांची कपात केली आणि जनतेवरील बोजा वाढणार नाही याची काळजी घेतली, असे ते म्हणाले.