

बंगळुरू : तमिळनाडूमध्ये 'टीव्हीके' ने काँग्रेससह इतर पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. 'टीव्हीके'चे प्रमुख जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोसेफ विजय यांचे अभिनंदन केले असून काँग्रेसवर मात्र घणाघाती टीका केली आहे. काँग्रेस हा परजीवी आणि मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसणारा धोकेबाज पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते कर्नाटकातील कार्यक्रमात बोलत होते. तसेच, केंद्र सरकार राज्याच्या विकासासाठी कायम सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी तमिळनाडूतील नव्या सरकारला दिले.
राजकीय वारे बदलताच काँग्रेसने दिला दगा
'सध्या तमिळनाडूतील परिस्थिती बघा. काँग्रेसचे द्रमुकसोबत २५ ते ३० वर्षे घनिष्ठ संबंध होते. वेळोवेळी द्रमुकसोबतच्या युतीने काँग्रेसला संकटातून बाहेर काढले आहे. खरे तर २०१४ पूर्वी १० वर्षे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार मोठ्या प्रमाणावर द्रमुकमुळेच टिकले. तरीही, जी द्रमुक काँग्रेसच्या भल्यासाठी सातत्याने काम करत होती, त्याच पक्षाला राजकीय वारे बदलताच काँग्रेसने दगा दिला', असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीरसभेत काँग्रेसवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस स्वतःच्या बळावर निवडणुका जिंकू शकत नाही, म्हणून ती मित्रपक्षांचा आधार घेते आणि नंतर त्यांनाच संपवते, असा खळबळजनक आरोप मोदींनी केला आहे. 'सत्तेच्या लालसेपोटी, सत्तालोभी काँग्रेसने पहिल्याच संधीत द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला. आता राजकीयदृष्ट्या टिकून राहण्यासाठी काँग्रेसला आणखी एका पक्षाची गरज आहे, ज्याच्या पाठीवर स्वार होऊन ती पुढे जाऊ शकेल'. काँग्रेसकडे ना धोरण आहे, ना नियत; केवळ सत्तेसाठी ते कोणाशीही हातमिळवणी करू शकतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
काँग्रेसने प्रादेशिक पक्षांचे महत्त्व केले कमी
विशेष म्हणजे काँग्रेस आता स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही. ज्याप्रमाणे परजीवी दुसऱ्याच्या जीवावर जगतात, तशीच अवस्था काँग्रेसची झाली आहे. ज्या पक्षांनी काँग्रेसला साथ दिली, त्यांनाच काँग्रेसने कमजोर केले. मित्रपक्षांच्या मतांवर निवडून येणे आणि नंतर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणे ही काँग्रेसची रणनीती आहे. काँग्रेसने नेहमीच प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला असून, अनेक राज्यांमध्ये युती करून त्या पक्षांनाच गिळंकृत केले आहे.
काँग्रेसचा इतिहास विश्वासघाताचा...
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात जुन्या संदर्भाचा उल्लेख करत म्हटले की, इतिहासात डोकावून पाहिले तर लक्षात येईल की काँग्रेसने ज्या-ज्या वेळी युती केली, त्या-त्या वेळी त्यांच्या मित्रपक्षांचे नुकसान झाले आहे. काँग्रेस हा असा पक्ष आहे जो ज्या ताटात खातो, त्याच ताटाला छिद्र पाडतो,' असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय वर्तुळात पडसाद
पंतप्रधानांच्या या 'परजीवी' विधानानंतर राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी यावर पलटवार करण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांनी काँग्रेसपासून सावध राहावे, असा संदेश या टीकेतून मोदींनी दिल्याचे स्पष्ठ होत आहे.
पुढील एक वर्ष सोने खरेदी करू नका !
हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे झालेल्या सभेत देशाच्या जनतेला पुढचे एक वर्ष सोने खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच पेट्रोल, डिझेल व खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे जगात मोठे तेलसंकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या आवाहनाला महत्त्व प्राप्त होत आहे.