'ऑपरेशन सिंदूर'नंतर अजून काही मोठं होणार? PM नरेंद्र मोदींनी रद्द केला नियोजित युरोप दौरा; जवानांच्या सुट्ट्याही 'कॅन्सल'

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने सीमा ओलांडून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नियोजित युरोप दौरा रद्द केला आहे. दुसरीकडे, रजेवर असलेल्या भारतीय निमलष्करी दलाच्या जवानांनाही गृहमंत्रालयाकडून परत बोलावण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, संग्रहित छायाचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने सीमा ओलांडून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नियोजित युरोप दौरा रद्द केला आहे. दुसरीकडे, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजेवर असलेल्या भारतीय निमलष्करी दलाच्या जवानांनाही गृहमंत्रालयाकडून परत बोलावण्यात आले आहे.

...म्हणून मोदींनी रद्द केला दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ ते १७ मे दरम्यान युरोपमधील तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन देशांचा युरोप दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली. युरोप दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्स या तीन देशांना भेट देणार होते. मोदी या ३ युरोपीय देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय चर्चा आणि बैठकांमध्ये सहभागी होणार होते. नॉर्वेमध्ये होणाऱ्या नॉर्डिक समिटमध्येही त्यांचा सहभाग निश्चित होता. हा दौरा रद्द करण्याचं नेमकं कारण सांगण्यात आलं नसलं तरी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान व पीओकेमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षा स्थितीमुळे दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. “हा दौरा सध्या रद्द करण्यात आला आहे. संबंधित देशांच्या सरकारांना याबाबत कळवण्यात आले आहे,” अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

जवानांच्या सुट्ट्याही रद्द

दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरनंतर गृह मंत्रालयानेही मोठे पाऊल उचलले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफ या सर्व अर्धसैनिक दलांच्या सुट्ट्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व जवानांना ड्युटीवर परतण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत. याशिवाय, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमांवर अतिरिक्त दलांची तैनाती करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक, विमानतळ, मेट्रो आणि इतर संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा अजून वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मंगळवारची मध्यरात्र उलटून गेल्यावर पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी अड्डे एअर स्ट्राईक करुन उडवले. त्यानंतर नियंत्रण रेषेवर भारत-पाक तणाव अधिक तीव्र झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in