

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सच्या वाढत्या संकटामुळे प्रवाशांचे हाल होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कायद्यांच्या अंमलबजावणीबद्दल एक महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. कोणताही नियम किंवा कायद्याचा उद्देश जनतेला त्रास देणे नसावा, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधानांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिले आहेत.
या सर्व परिस्थितीनंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाबाबत आता पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितले की, इंडिगो विमानसेवेच्या निर्माण झालेल्या गोंधळाबाबत मोदींनी चिंता व्यक्त केली आहे.
इंडिगोची अनेक विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत बोलताना मोदींनी सांगितले की, ‘नियम आणि कायदे महत्त्वाचे, पण त्यांचा उद्देश व्यवस्था सुधारणे हाच असला पाहिजे, लोकांना त्रास देणे हा नाही. नियम लोकांना त्रास देण्यासाठी नाही, तर व्यवस्था सुधारण्यासाठी असतात’, असे मोदींनी म्हटले असल्याचे रिजिजू म्हणाले.
मोदी काय म्हणाले?
एनडीए बैठकीत मोदींनी नेमके काय भाष्य केले याची माहिती देताना संसदीय कामकाजमंत्री रिजिजू यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी म्हटले आहे की सरकारमुळे लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची खात्री करा. कोणताही कायदा लोकांवर ओझे असू नये. तो त्यांच्या सोयीसाठी आणि लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी असला पाहिजे, असे मोदींनी म्हटले असल्याचे रिजिजू यांनी सांगितले.