पंतप्रधानांचा पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा! भारतात बनलेल्या वस्तूच खरेदी करण्याचा सल्ला

भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या ‘टॅरिफ वॉर’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा आग्रह धरला आहे. आता गुरुग्राम ते दिल्ली आयजीआय विमानतळापर्यंत बांधलेल्या या द्वारका एक्स्प्रेस-वेसोबतच, अर्बन एक्स्टेंशन रोड-२ चे (यूईआर-२) उद्घाटन करताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा देशवासीयांना भारतीय बनावटीच्या वस्तू वापरण्याचा सल्ला दिला.
पंतप्रधानांचा पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा! भारतात बनलेल्या वस्तूच खरेदी करण्याचा सल्ला
Photo : X(@PMOIndia)
Published on

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या ‘टॅरिफ वॉर’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा आग्रह धरला आहे. आता गुरुग्राम ते दिल्ली आयजीआय विमानतळापर्यंत बांधलेल्या या द्वारका एक्स्प्रेस-वेसोबतच, अर्बन एक्स्टेंशन रोड-२ चे (यूईआर-२) उद्घाटन करताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा देशवासीयांना भारतीय बनावटीच्या वस्तू वापरण्याचा सल्ला दिला.

जर तुम्ही भारतीय असाल तर फक्त भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. दिवाळीलाही, फक्त भारतीयांनी भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. व्यापाऱ्यांनी परदेशी वस्तूंऐवजी स्थानिक वस्तू विकल्या पाहिजेत. काही वर्षांपूर्वी आम्ही परदेशातून खेळणी आयात करायचो. आम्ही स्थानिक पातळीवर खेळणी बनविण्याचा संकल्प केला आणि आज आम्ही १०० हून अधिक देशांमध्ये खेळणी पाठवतो, असे मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले की, “जीएसटीमध्ये पुढील टप्प्यातील सुधारणा होणार आहेत. दिवाळीत दुप्पट बोनस दिला जाणार आहे. आम्ही त्याचे संपूर्ण स्वरूप राज्यांना पाठवले आहे. मला आशा आहे की, सर्व राज्ये सरकारला सहकार्य करतील. ही दिवाळी अधिक भव्य व्हावी म्हणून आम्ही ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू.

सुधारणा म्हणजे सुशासनाचा विस्तार

“आमच्यासाठी सुधारणा म्हणजे सुशासनाचा विस्तार. म्हणून आम्ही सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आगामी काळात आम्ही मोठमोठ्या सुधारणा करणार आहोत, ज्यामुळे जीवन आणि व्यवसाय दोन्ही सोपे होतील. दिल्लीच्या मागील सरकारांनी दिल्लीला उद्ध्वस्त केले. नवीन भाजप सरकारला दिल्ली पुन्हा उभारण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. यूपीए सरकारच्या काळात फायली हलायच्या, आम्ही त्यावर काम सुरू केले. राज्यांमध्ये भाजप सरकारे स्थापन झाली तेव्हा विकास सुरू झाला,” असे मोदी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in