सर्व गटांनी भावी पिढ्यांच्या हितासाठी शांततेच्या मार्गावर यावे - पंतप्रधान; अनेक प्रकल्पांची केली पायाभरणी

मणिपूरमधील सर्व गटांनी हिंसाचार सोडून भावी पिढ्यांच्या हितासाठी शांततेच्या मार्गावर येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले. मणिपूरच्या नावात 'मणि' आहे आणि हा 'मणि' भविष्यात संपूर्ण ईशान्येला चमकवणार आहे, असेही मोदी या वेळी म्हणाले.
सर्व गटांनी भावी पिढ्यांच्या हितासाठी शांततेच्या मार्गावर यावे - पंतप्रधान; अनेक प्रकल्पांची केली पायाभरणी
Published on

इम्फाळ : मणिपूरमधील सर्व गटांनी हिंसाचार सोडून भावी पिढ्यांच्या हितासाठी शांततेच्या मार्गावर येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले. मणिपूरच्या नावात 'मणि' आहे आणि हा 'मणि' भविष्यात संपूर्ण ईशान्येला चमकवणार आहे, असेही मोदी या वेळी म्हणाले.

मणिपूरमध्ये दोन वर्षांपूर्वी वांशिक संघर्ष उफाळून आल्यापासून आजमितीपर्यंत हे राज्य धगधगत आहे. मोदी शनिवारी प्रथमच या राज्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी चुराचंदपूरसह इम्फाळ या संघर्षाची अधिक झळ बसलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या आणि विस्थापितांशी संवाद साधला.

मी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचे आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन करतो. आज मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्याबरोबर आहे. भारत सरकार तुमच्यासोबत, मणिपूरच्या लोकांसोबत आहे. मणिपूरमध्ये जीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या कुटुंबांनी आपली घरे गमावली त्यांच्यासाठी आमचे सरकार ७,००० नवीन घरे बांधण्यास मदत करत आहे, असे आश्वासनही मोदींनी यावेळी दिले.

आम्ही मणिपूरमध्ये रस्ते आणि रेल्वेसाठीच्या बजेटमध्ये २०१४ पासून सातत्याने वाढ केली. अलिकडच्या काळात राष्ट्रीय महामार्गांवर ३,७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ८,७०० कोटी रुपये नवीन महामार्गांसाठी वापरले जात आहेत. २२,००० कोटी रुपयांचा जिरीबाम-इम्फाळ रेल्वे मार्ग लवकरच राज्याची राजधानी राष्ट्रीय नेटवर्कशी जोडली जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

विस्थापितांसाठी विशेष पॅकेज

मोदींनी मणिपूरसाठी ३,००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले. त्यामध्ये हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्यांना मदत करण्यासाठी ५०० कोटी रुपये समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच मोदी म्हणाले की, घरे गमावलेल्या कुटुंबांसाठी सरकार ७,००० नवीन घरे बांधण्यास मदत करत आहे आणि योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्य देत आहे.

कनेक्टिव्हिटी

मोदी हे दोन दिवस ईशान्य भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी असलेल्या खराब हवामानामुळे त्यांना मिझोरमची राजधानी ऐझॉल येथील विमानतळावरूनच सुमारे ९००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करावे लागले. यावेळी मोदींनी ऐझॉलमधून तीन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधानांनी बैराबी-सायरंग रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. या रेल्वे मार्गामुळे मिझोरम पहिल्यांदाच देशातील इतर राज्यांशी थेट रेल्वे नेटवर्कने जोडण्यात आले आहे. यामुळे आता मिझोरममधून दिल्लीसाठी थेट रेल्वेसेवा सुरू झाली आहे. या नव्या रेल्वे लाईनमुळे या भागातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

विकासाची जीवनरेषा

मिझोराम आज भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा दिवस मिझोरामच्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे. ऐझॉल भारताच्या रेल्वे नकाशावर आले आहे. काही वर्षांपूर्वी मी या रेल्वे लाईनची पायाभरणी केली होती आणि आज संपूर्ण देशासाठी ही रेल्वे सुरु होत आहे. अनेक अडचणींवर मात करून, बैरबी-सैरंग रेल्वे लाईन प्रत्यक्षात आली आहे. हे काम आपल्या अभियंत्यांच्या कौशल्यामुळे आणि कामगारांमुळे शक्य झाले. या रेल्वेमुळे पहिल्यांदाच मिझोराममधील सैरंग शहर राजधानी एक्सप्रेसमुळे थेट दिल्लीशी जोडले जाईल. ही केवळ रेल्वे लाइन नाही, तर ती विकासाची जीवनरेषा आहे. यामुळे मिझोरामच्या लोकांचे जीवनमान सुधारेल. शेतकरी आणि व्यावसायिकांना देशभरातील बाजारात आपली उत्पादने विकता येतील. तसेच, शिक्षण आणि आरोग्याच्या चांगल्या संधीही मिळतील. या विकासामुळे अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्या निर्माण होतील, असे मोदी म्हणाले.

हेलिकॉप्टर सेवा

गेल्या अकरा वर्षांपासून सरकार ईशान्य भारताच्या विकासासाठी काम करत आहे. आता हा प्रदेश भारताच्या विकासाचे इंजिन बनत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक ईशान्येकडील राज्यांना रेल्वेने जोडले गेले आहे. पहिल्यांदाच, ग्रामीण रस्ते, महामार्ग, मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वीज, नळाचे पाणी आणि गॅस कनेक्शनचा विस्तार करण्यात आला आहे. भारत सरकारने सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता लवकरच मिझोराममध्ये हवाई प्रवासासाठीच्या योजनाही तयार केल्या जातील. या ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा सुरू होतील. ज्यामुळे मिझोरामच्या दुर्गम भागांमध्ये पोहोचणे सोपे होईल, असेही त्यांनी सांगितले.

नवी पहाट...

तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शांतता स्वीकारणे हा एकमेव मार्ग आहे. मणिपूर ही आशा आणि आकांक्षांची भूमी आहे. पण दुर्दैवाने या सुंदर प्रदेशात हिंसाचाराच्या घटना घडल्या. मी आता काही बाधित झालेल्या नागरिकांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की मणिपूरमध्ये आशा आणि विश्वासाची एक नवीन पहाट उगवत आहे, असे मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in