
आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२६वी जयंती. यानिमित्त दरवर्षी देशामध्ये 'पराक्रम दिवस' साजरा केला जातो. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यानिमित्त दक्षिण अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यादरम्यान, अंदमान आणि निकोबारमधील २१ मोठ्या बेटांचे नामकरण करण्यात आले. या बेटांची नावे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवण्यात आली.
सदर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "हे बेटे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील. अंदमानच्या या भूमीवर पहिल्यांदाच मुक्त तिरंगा फडकवला गेला. त्या अभूतपूर्व उत्कटतेचे आवाज आजही सेल्युलर जेलच्या कोठडीमधून अपार वेदनांसह ऐकू येतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजींना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकशाहीच्या स्तंभासमोरील ‘कर्तव्य पथ’येथील नेताजींचे स्मारक आपणांस आपल्या कर्तव्यांची आठवण करुन देतो. तसेच, वीर सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांनी अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगला. आज २१ बेटांना नावे देण्यात आली, त्यातून अनेक संदेश मिळणार आहेत. हा संदेश 'एक भारत श्रेष्ठ भारत'चा असून, आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याचा आहे."