वडिलांचे नाव घ्यायला लाज का वाटते? पंतप्रधान मोदींचा तेजस्वी यादव यांना सवाल

राष्ट्रीय जनता दलाच्या पोस्टर्समधून माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचा फोटो गायब आहे. आपल्या वडिलांचे नाव घ्यायला तेजस्वी प्रसाद यांना लाज का वाटते. कोणते पाप आहे, जे राजद पक्षाला बिहारच्या तरुणांपासून लपवावे लागत आहे, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
वडिलांचे नाव घ्यायला लाज का वाटते? पंतप्रधान मोदींचा तेजस्वी यादव यांना सवाल
Published on

कटिहार : बिहारचे मुख्यमंत्रीपद अनेक वर्षे लालूप्रसाद यादव यांनी भूषवले होते. आता राष्ट्रीय जनता दलाच्या पोस्टर्समधून माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचा फोटो गायब आहे. आपल्या वडिलांचे नाव घ्यायला तेजस्वी प्रसाद यांना लाज का वाटते. कोणते पाप आहे, जे राजद पक्षाला बिहारच्या तरुणांपासून लपवावे लागत आहे, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने छठ महापर्वाला ‘ड्रामा’ म्हटलं, जेणेकरून बिहारमधील लोक राजदवर राग काढतील आणि तिला पराभूत करतील. राजदने काँग्रेसला ‘कट्टा’ दाखवून मुख्यमंत्री पदाचं नावही जाहीर करून घेतले, असे ते म्हणाले.

काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले, ‘जे बिहारवासियांना अपमानित करतात, ज्यांनी त्यांना शिव्या दिल्या. त्यांनाच काँग्रेसने प्रचारासाठी बोलावले, जेणेकरून लोकांचा राग राजदवर उतरावा. काँग्रेसला ठाऊक आहे, या वेळेस राजद हरली तर तिचे राजकारण संपेल आणि काँग्रेस तिच्या मतदार बँकेवर कब्जा करेल.’ असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, ‘वेगवेगळ्या राज्यांतील काँग्रेस नेत्यांकडून बिहारच्या लोकांबद्दल जाणूनबुजून अपमानजनक वक्तव्ये करवली जात आहेत. केरळमधील काँग्रेस नेत्याने तर बिहारच्या लोकांची तुलना बीडीशी केली. हे सगळं काँग्रेसच्या नीतीचा भाग आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

मोदी म्हणाले, “विरोधी पक्षाचे लोक मतांसाठी सुरक्षेशी खेळ करत आहेत. तुमच्या हक्काचे धान्य ते घुसखोरांना द्यायला इच्छुक आहेत. भारताच्या संसाधनांवर केवळ इथल्या नागरिकांचा हक्क आहे, पण काँग्रेस आणि आरजेडीवाल्यांना ‘कट्टा’ आणि ‘कट्टरपंथी’च आवडतात, असा टोला मोदी यांनी लगावला.

मोदींनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या योजनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’मुळे बिहारच्या बहिणींच्या खात्यात १०–१० हजार रुपये जमा झाले आहेत. आतापर्यंत १.४० कोटी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. डबल इंजिनच्या एनडीए सरकारचा हा मोठा फायदा आहे. दिल्ली आणि पाटण्यातून निघालेला एक एक रुपया थेट जनतेच्या खात्यात पोहोचतो. आता कोणी चोर ते लुटू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in